पान:चित्रा नि चारू.djvu/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बळवंतराव व चित्रा, महंमदसाहेब व फातमा ही बोलत बसली होती. गावचे काही प्रतिष्ठित लोक तेथे बसलेले होते. बोलता बोलता धर्माच्या गोष्टी निघाल्या.

 "महंमदसाहेब, तुमचे बाकी धाडस आहे. फातमाला तुम्ही मोकळेपणे मुलांच्या शाळेत शिकवता, याचे कौतुक वाटते." बळवंतराव म्हणाले.

 "रावसाहेब, तुम्ही तुर्कस्तानात जाल तर चकित व्हाल. जगात कोठेही नाही इतके स्त्रीस्वातंत्र्य तेथे आहे. तुर्की असेंब्लीत जितक्या स्त्रिया आहेत, तितक्या स्वातंत्र्याचे माहेरघर समजले जाणा-या अमेरिकेच्या सेनेटमध्येही नाहीत. केमाल पाशाने ही क्रांती केली."

 "परंतु तुम्हा मुसलमानांस हे आवडते का? हिंदी मुसलमान केमालचे कौतुक करतील, परंतु आपल्या स्त्रियांना जनानखान्यात, पडद्यात ठेवतील." बळवंतराव म्हणाले.

 "मला माझ्या धर्मबंधूची कीव येते. पैगंबरांचा थोर संदेश अद्याप आम्हाला समजला नाही. ज्ञानाला पैगंबर फार मान देत. पैगंबरांची मुलगी फातमा कुराणावर प्रवचन करी. हुतात्म्यांच्या रक्तापेक्षाही नवीन ज्ञान देणारी शाईची एक ओळ अधिक महत्वाची आहे असे पैगंबर म्हणत. रात्रंदिवस नमाज पढणा-यांपेक्षा सृष्टीचे गूढ उकलणारा, सृष्टीचे नीट परीक्षण करणारा, निसर्गाचा अभ्यास करणारा अधिक धार्मिक होय असे पैगंबर म्हणत. पैगंबरांचा संदेश पहिली तीनचारशे वर्षे आम्ही ऐकला व इ. सनाच्या ७ व्या ते १० व्या शतकापर्यंत ज्ञानात आम्ही अग्रेसर होतो. प्रचंड विद्यापीठे आम्ही स्थापिली, सर्व शास्त्रांत शोध लावले. रावसाहेब, इस्लामी धर्मातील ती तेजस्वी ज्ञानोपासना आमच्यात केव्हा सुरू होईल ते खुदा जाने."

 "स्त्रियांच्या बाबतीत पैगंबरांची दृष्टी कशी होती?"

 "अत्यंत उदार होती. स्वर्ग जर कोठे असेल तर तो मातेच्या चरणी आहे असे ते म्हणत. स्त्रियांना त्यांनी वारसा हक्क दिला. त्यांना काडीमोडाची परवानगी दिली. पैगंबरांनी त्यांच्या काळात अरबस्तानातील परिस्थिती लक्षात घेऊन खरोखरच किती तरी केले."

चित्रा * ७