पान:चित्रा नि चारू.djvu/4

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आली. त्यांच्या पत्नीचे नाव सीता. सीताबाईंना एक मुलगी व तीन मुलगे होते. मुलगी सर्वांत मोठी, तिचे नाव चित्रा. चित्रा आता जवळजवळ १५-१६ वर्षांची होती. भावांची नावे श्यामू, रामू व दामू अशी होती. श्यामू बारा वर्षांचा होता. रामू दहा वर्षांचा होता. दामू सात वर्षांचा होता. दामूच्या पाठीवर मात्र सीताबाईंस मूल झाले नव्हते. सर्वांत लहान तो सर्वांचा लाडका होता; परंतु बळवंतरावांचे चित्रेवर फार प्रेम होते. चित्रा जन्माला आली व ते मामलेदार झाले होते. इतक्या लवकर आपणास मामलेदारीचा योग आला याचे कारण चित्रा, असे ते म्हणत. चित्रा म्हणजे आपल्या कुटुंबाचे भाग्य आहे, सुदैव आहे, असे ते म्हणायचे. चित्राच्या आधी झालेली मुले मरण पावली होती. परंतु चित्रा जगली, मोठी झाली, तीच वाचली एवढेच नव्हे, तर आपल्या पाठच्या भावडांनाही तिने आयुष्य दिले, यामुळे बळवंतराव चित्राला जीव की प्राण करीत. तिचे मन ते कधी दुखवीत नसत. तिची इच्छा नेहमी पूर्ण करीत.

 चित्रा आता इंग्रजी शाळेत होती. पाचवी-सहावीत होती. निर्मळपूरच्या फौजदारांची नात फातमा तिची मैत्रीण होती. फातमा तिच्यात वर्गात होती. मुसलमान मुली इंग्रजी शाळेत क्वचितच असतात, परंतु फातमाचे आजोबा सुधारक होते. ज्ञान ही पवित्र वस्तू आहे असे ते म्हणत. बुरख्याचे थोतांड त्यांस पसंत नसे.

 फातमाची आई लहानपणीच वारली होती. तिच्या बापाने पुढे दुसरे लग्न केले. फातमा आजोळीच असे. आजोबा महंमदसाहेब फातमावर जीव की प्राण करीत. फातमाचा बाप हसन तिला भेटायला मधूनमधून येत असे.

 एकदा एके रविवारी बळवंतराव एका खेड्यावर वनभोजनासाठी गेले होते. एका मळ्यात उतरले होते. फौजदार महंमदसाहेब व फातमा ही ही आली होती. चित्रा, श्यामू व रामू हीही आली होती. सुंदर अशी बैठक आमराईत घातलेली होती. तिकडे मोट धो धो चालू होती. भाजीपाल्याचा आसपास फुलझाडेही होती. श्यामू व रामू तिकडे रंगले. रताळी उपटून ते खात होते. टमाटो मटकावीत होते.

६ * चित्रा नि चारू