पान:चित्रा नि चारू.djvu/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "परंतु त्यांनी बहुपत्नीकत्वाची चाल ठेवली."

 "त्याचे कारण आहे अरबस्तानात स्त्रियांची संख्या जास्त होती. शिवाय युद्धकैद्यांच्या स्त्रियांचे काय करायचे हाही प्रश्न असे. त्यांना गुलाम करण्यापेक्षा पत्नी म्हणून करून घेणे अधिक भूतदयेचे असे. असे अनेक प्रश्न त्या काळातील अरबस्तानात होते; परंतु तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे, की पैगंबरांनी कुराणात स्वच्छ सांगितले आहे की, ‘चार बायकांची मर्यादा ठेवा.’ एवढेच नव्हे, तर ते पुढे म्हणतात, ‘एकच करणे अधिक श्रेयस्कर.’"

 "परंतु काय हो महंमदसाहेब, पैगंबरांनी तर खूप लग्ने केली.’"

 "त्या लग्नांकडे निराळ्या दृष्टीने आपण पाहिले पाहिजे. लक्षात ठेवा की, पैगंबरांची पहिली पत्नी खदिजा जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत त्यांनी दुसरी बायको केली नाही. ते जर केवळ भोगासक्त असते तर ते इतकी वर्षे असे एकपत्नी राहाते ना. खदिजेच्या मरणानंतरची पैगंबरांची लग्ने ही अरबी भांडणे बंद करण्यासाठी होती. निरनिराळ्या जाती, वंश, कुळे यांत भांडणे असत. परंतु पैगंबरांनी त्या त्या कुळांतील एखाद्या स्त्रीशी लग्न केले, म्हणजे आपोआप भांडणे थांबत. कधी धर्माच्या कामी मरण पावलेल्यांच्या पत्नीचा तिच्याशी लग्न करूनच ते अधिक सांभाळ करू शकत. रावसाहेब, महापुरूषांची लग्ने कधीकधी त्या स्त्रीच्या रक्षणार्थ केवळ असतात. त्यात कामुकता नसते. पैगंबर जर असे विषयासक्त असते तर त्यांचा त्यात प्रभाव पडता का? आज तेराशे वर्षे पैगंबर कोट्यवधी लोकांच्या हृदयाचे सम्राट आहेत, तसे राहाते का? कोणा भोगी किड्याने कोट्यवधी जनतेला शेकडो वर्षे मार्गदर्शन केल्याचे आहे का उदाहरण?"

 "महंमदसाहेब, तुमचे म्हणणे खरे आहे. पैगंबर एक अवतारी विभूती होऊन गेले. मराठीत त्यांचे सुंदर चरित्र अद्याप नाही. हिंदुस्थानात आपण हिंदु-मुसलमान एकत्र राहातो, परंतु सहानुभूतीने एकमेकांच्या संस्कृतीच्या कधी अभ्यास केला नाही. आपण दूर दूर राहिलो." बळवंतराव म्हणाले.

 "एके काळी तसा प्रयत्न झाला..." महंमदसाहेब म्हणाले.

८ * चित्रा नि चारू