पान:चित्रा नि चारू.djvu/3

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
चित्रा


बळवंतराव मामलेदार फार लोकप्रिय होते. मामलेदार म्हणजे तालुक्याचा राजा. हिंदुस्थानातील इंग्रजांचा कारभार तेच चालवत होते असे म्हणा ना. मामलेदारावर तालुक्यातील सुखदुःख अवलंबून असते. मामलेदार सव्यसाची असतो. त्याला मुलकी सत्ता व फौजदारी सत्ता. आरोप करणारा तोच, शिक्षा देणारा तोच. तालुक्यातील पीक पाणी कसे आहे याचा अहवाल तोच देणा. सरासूट द्यायला हवी की नको याची शिफारस तोच करणार. गोरगरिबांवर अन्याय होत नाहीत ना, हे तोच पाहणार. मामलेदार मनात आणील तर तालुका सुखी करू शकेल. निदान त्याच्या हातात असते तितके तरी तो प्रामाणिकपणे करील तरी लोकांना पुष्कळसे हायसे वाटेल.

बळवंतराव हे अपवादात्मक मामलेदार होते. लाचलुचपत त्यांना माहीत नव्हती. पापभिरू व देवभीरू ते होते. इकडे देवदेवतार्चन भरपूर करावयाचे व तिकडे पैसे खावयाचे असा त्यांचा धर्म नव्हता. ते फिरतीवर गेले म्हणजे शेतकरी त्यांना भेटी देत. कोणी तूप देई, कोणी काही देई, परंतु बळवंतराव घेत नसत.

"मला धुतल्या तांदळासारखी राहू दे. तुम्ही कदाचित प्रेमानेही देत असाल, परंतु लोक निराळा अर्थ करतील. म्हणतील की, हा मामलेदार लाच घेतो. नकोच हे घेणे." असे ते म्हणावयाचे.

त्यांची नुकतीच निर्मळपूरला बदली झाली होती. सामानसुमान सारे आले. ते आधी एकटेच पुढे आले होते. मंडळी मागून