पान:चित्रा नि चारू.djvu/७७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 "चित्रा, आपण जाऊ."

 "चला."

 "परंतु माझी आई आहे हो."

 "पुत्रशोकाने त्यांचा पुनर्जन्म झाला असेल. किती झाले तरी मातृहृदय ते. चला जाऊ. मला भीती नाही वाटत आणि तू जवळ आहेस. खरे ना?" सर्वांचा निरोप घेऊन चित्रा व चारू आपल्या गोंडगावला आली. रात्रीची वेळ होती.

 "आई !' चारूने हाक मारली.

 "आल्ये रे. चारू आला ! " आईने हाक दिली. ती धावत आली. कडी काढण्यात आली.

 "दारात उभी राहा. मीठमोहऱ्या टाकते हो." असे म्हणून माता घरात गेली. मीठमोहऱ्या घेऊन आली. त्या ओवाळून टाकण्यात आल्या. मुलगा व सून घरात आली. वृद्ध पिताही उठून खाली आला.

 "बाबा, पाया पडतो." चारू म्हणाला.

 "मामंजी, नमस्कार करत्ये." चित्रा म्हणाली.

 "जन्मसावित्री हो. पुत्रवती हो." सासरा सकंप म्हणाला.

 "आई, नमस्कार करत्ये." चित्रा म्हणाली.

 " तुझी आता खरीखुरी आई होईन हो. आता नाही हो राग करणार ! चित्रा, चारू क्षमा करा मला. बाळ, तू घर सोडून गेलास नि कधी गोडाला स्पर्श नाही हो केला."

 "आई, आता आपण आनंदात राहू. "

 "होय हो, राहू."

 खरेच, आनंदी आनंद झाला. सासू आता मनापासून चित्रावर प्रेम करी. ती खरी आई झाली.

 चित्राने फातमाच्या मोलकरणीसाठी शंभर रुपये फातमाकडे पाठवून दिले. फातमाला गोड पत्र लिहिले. फातेमाचेही आले.

 असे दिवस आता आनंदात जात होते. काही महिने गेले. एके दिवशी फातमाचे गोड पत्र आले होते. चित्रा वाचीत होती. मंद हास्य तिच्या तोंडावर होते. चारू दारातून पाहात होता.

आनंदी आनंद * ७९