पान:चित्रा नि चारू.djvu/७६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 "वर्तमानपत्रात ' चित्रा सापडली. चारू, तू परत ये. अमूक पत्त्यावर ये.' असे दिले आहे. येईल हो चारू. निश्चित राहा. मनाला आता त्रास नका देऊ. " आमदार हसन गोड वाणीने म्हणाले.

 "चल चित्रा, ने मला." बळवंतराव म्हणाले.

 "आधी माझ्याकडे सारे चहा घ्या." हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले.

 "डॉक्टर, तुमचे उपकार. तुम्ही बाबांची काळजी घेतलीत." चित्रा डोळे भरून येऊन म्हणाली.

 डॉक्टरांकडे चहा होऊन चित्रा, बळवंतराव दत्तमंदिरात आली. आमदार हसन व गोविंदराव मुंबईस गेले.

 बळवंतरावांची स्मृती आली. त्यांनी आमदारांच्या सल्ल्याने वरपर्यंत अर्ज वगैरे करून अन्यायाची दाद लावून घेतली. पुन्हा मामलेदारी मिळाली. ते कामावर रुजू झाले. ठाण्याहून येताना त्यांनी हॉस्पिटलचे डॉक्टर व दत्तमंदिरातील प्रेमळ डॉक्टर यांना भेटी दिल्या. दत्ताच्या मूर्तीसही एक सुंदर अलंकार करून दिला.

 एके दिवशी चारू आला. त्या वेळेस चित्रा एकटीच खोलीत होती. रडत होती. बळवंतराव कामावर गेले होते. मुले शाळेत गेली होती. सीताबाई झोपल्या होत्या. भोजूही झोपला होता. आणि चारू आला. चित्रासमोर उभा राहिला.

 "चित्रा ! " त्याने मंजूळ हाक मारली.

 "चारू, माझा चारू ! आला, चारू आला !"

 दोघांना अत्यानंद झाला. काय बोलणार? त्यांच्या त्या स्थितीचे कोण वर्णन करील?

 "आईला सांगते हो चारू. आता जाऊ नको कोठे."

 "तूच गेली होतीस मला सोडून."

 घरात सर्वांना कळले. भोजू धावतच कचेरीत गेला व सांगून आला. रावसाहेब घरी आले. चारू त्यांच्या पाया पडला, देवाला गूळ ठेवण्यात आला. सर्वांना आनंद झाला.

 बळवंतरावांनी मोठा सत्यनारायण केला. साऱ्या गावाला प्रसाद वाटण्यात आला.

.७८ * चित्रा नि चारू