पान:चित्रा नि चारू.djvu/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "वेड लागले ? " चित्राने भिऊन धस्स होऊन विचारले.

 " अहो, येथे ठाण्याला एक वेड्यांचे हॉस्पिटल आहे. त्यात एक वेडा बळवंतराव आहे. ठाण्याला माझे एक मित्र आहेत, ते सांगतात मजा. मामलेदारच होते ते. वेडात कलेक्टरला सारखे शिव्या देतात."

 "गोविंदराव, मी ठाण्यास जाऊन येतो. मी फातमास शब्द दिला आहे, की तुझ्या मैत्रिणीची सर्व व्यवस्था केल्याशिवाय मी राहाणार नाही. जातो मी. माहिती मिळताच येईन."

 असे म्हणून आमदार हसन ठाण्यास आले. ते त्या वेड्यांच्या दवाखान्यात गेले. तेथील डॉक्टरांना भेटले. तो तेच बळवंतराव असे ठरले. हसनसाहेबांस आनंद झाला.

 “ त्यांच्या पत्नी, मुलेबाळे येथे जवळच राहातात. त्यांचा गडी भोजू येथे येतो. असा गडी पाहिला नाही बोवा. धन्याचे सारे कुटुंब जणू तो पोशीत आहे. धन्य त्या भोजूची. गरीब माणसे व फार न शिकलेली. परंतु हसनसाहेब, किती उदात्तता त्यांच्या जीवनात आढळते !" डॉक्टर म्हणाले.

 "आमच्या फातमाचीही मोलकरीण पाहा ना. बळवंतरावांच्या घरचा रस्ता कोणी दाखवील का ? "

 "याच मोटारीतून तुम्हाला पोचवतो."

 "आभारी आहे, डॉक्टरसाहेब. "

 "अहो आभार कसचे ? आम्ही सर्वांनी तुमचे आभार मानले पाहिजेत. तुम्ही एका हिंदू मुलीसाठी किती ही खटपट चालविली आहे ! चला. "

 मोटारीतून दोघे दत्तमंदिरात आले. दत्तमंदिरातील डॉक्टर मोटारचा आवाज ऐकून बाहेर आले, तो वेड्यांच्या दवाखान्याचे डॉक्टर !

 "काय डॉक्टर ! "

 "आता इकडे कोठे आलेत ?"

 "बळवंतरावांची मंडळी येथे राहातात ना ? त्यांच्या मुलीचा शोध लागला आहे. ती मुंबईस सुरक्षित आहे."

 "त्या पलीकडच्या खोलीत त्या राहातात. चला, मी येतो."

आनंदी आनंद * ७५