पान:चित्रा नि चारू.djvu/७१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 जेवणे झाली. दिलावरचा चेहरा खिन्न होता. त्याला काहीतरी दुःख होत होते. शल्य खुपत होते.

 " चित्रा, ही घे पानपट्टी. तुझा विडा रंगेल, आणि माझाही आता रंगतो हो ! दिलावर, ही तुला घे. बाबा, ही तुम्हाला ! "

 "फातमा, मला शेवटी वाटते ! "

 "बाबा, बसा सारी. मी तुम्हाला ज्या कामासाठी बोलावले ते आता सांगते. दिलावर, बसा. चित्रा, बस."

 सारी बसली आणि फातमाने चित्राची सारी हकीगत पित्याला निवेदिली. दिलावर काळा ठिक्कर पडला. आमदारसाहेब गंभीर झाले.

 "दिलावर, तुम्ही इस्लामी धर्माला काळोखी फासलीत. काय हे ? परंतु अद्याप मर्यादेत आहात. या मुलीच्या अब्रूचे तरी धिंडवडे केले नाहीत ! माझ्याजवळ का नाही मागितलेत पैसे ? पैशासाठी का मुली पळवाव्या, विकाव्या ? कोठे हे पाप फेडाल ? किती आहे कर्ज ? मी सारे फेडतो. पुन्हा कर्ज नका करू. जरा बेताने वागा. उद्या खटला झाला तर काय होईल ? माझ्या तोंडाला काळिमा. चित्रा, तू माझ्याबरोबर चल बेटा. मुंबईला पुष्कळ आमदार माझ्या ओळखीचे आहेत. हिंदू आमदार. त्यांच्याकडे तुला नेतो. तुझ्या पित्याचा व पतीचा शोध करतो. हो. दिलावर, फातमा होती म्हणून ही गरीब गाय वाचली. तिची क्षमा माग. तिला चोळीबांगडी दे. तू आता तिचा भाऊ हो. ती तुझी बहीण मान. दरसाल दिवाळीला तिला भाऊबीज पाठव. भेट पाठव."

 दिलावरने माफी मागितलो. फातमाने आणून ठेविलेली भेट त्याने चित्राला दिली. सर्वांना आनंद झाला. फातमा व चित्रा दोघी निघून गेल्या. आमदार व दिलावर बोलतबोलत घोरू लागले.

चित्रा नि चारू.djvu
आमदार हसन * ७३