पान:चित्रा नि चारू.djvu/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "फार प्रेमाची मैत्रीण आहे वाटते ? मला खर्च नको करूस असे सांगतेस आणि तू आता खर्च करतेस तो ? "

 "दिलावर. माझी मैत्रीण कधी तरी आली आहे ? रोज तुझे ते शेकडो दोस्त येतात. नको हो आणू श्रीखंड ! ”

 "आणीन ! श्रीखंड आणीन, बासुंदी आणीन !"

 दिलावर गेला आणायला. फातमाने रसोई केलीं ; टमाटोचा रस्सा केला; कच्या कोबीची कोशिंबीर ; खोब-याची चटणी. दिलावरही श्रीखंड घेऊन आला.

 "केव्हा येणार तुझी मैत्रीण ?"

 "येईल ! तुला भूक का लागलो ? बाबा नि तू बसवा का ? आम्ही दोघी मैत्रिणी मागून बसू. मी बाबांना विचारून येते."

 फातमा दिवाणखान्यात आली. ताजी वर्तमानपत्रे आमदारसाहेब वाचीत होते.

 "बाबा, बसता का जेवायला ? मैत्रिणीला यायला अवकाश आहे."

 "आपण बरोबरच बसू. मीही जरा बाहेर जाऊन येतोः दिलावर कोठे आहेत ?"

 इतक्यात दिलावर तेथे आला.

 " काय ?" त्याने विचारले.

 "दिलावर, जरा बाहेर येता ? आपण जाऊन येऊ एके ठिकाणी तोपर्यंत फातमाची मैत्रीणही येईल."

 "चला. "

 सासरे-जावई बाहेर गेले. फातमाने चित्राची खोली उघडली. चित्राने मंगल स्नान केले होते. सुंदर रेशमी साडी ती नेसली होती. फातमाने नवी आणून दिली होती. केसात फुले होती. फातमाने प्रेमाने घातली होती. चित्राचे मुख प्रसन्न दिसत होते.

 " चित्रा, चल बाहेर, आपण दोघी बोलत बसू."

 " चल."

 दोघीजणी बाहेर येऊन बसल्या. एका टेबलाभोवती चार खुर्च्या होत्या. टेबलावर ताटे होती.

आमदार हसन * ७१