पान:चित्रा नि चारू.djvu/६८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 दिलावर, अरबस्तान म्हणजे वाळवंट. शेतेभाते नाहीत, नद्या नाहीत. कालवे नाहीत. फार पाऊस नाही. तेथले लोक शाकाहारी कसे होतील ? केवळ खजुरावर कसे जगतील ? म्हणून तेथे उंट मारावे लागतात. मांस खावे लागते. परंतु अरबस्तान जर हिंदुस्थानसारखा सुजल, सुफल, सस्यश्यामल असता, तर पैगंबरांनी मांस खाऊ नका असेच सांगितले असते. परिस्थित्यनुरूप सांगावे लागते. जे शक्य व झेपण्यासारखे तेच धर्मपुरुष शिकवतात. त्या चीनमधले लोक म्हणे वाटेल ते खातात. न ख़ातील तर करतील काय ? ४० कोटी लोक. नद्यांना मोठमोठे पूर येतात. नद्यांचे प्रवाह बदलतात. मोंगोलियांतून वाळूची वादळे उठतात व वाळूचे थर येऊन पडतात. नेहमी दुष्काळ. कसे जगतील चिनी लोक ? परंतु वाटेल ते खाणारे चिनीही नद्यांचे पूर उतरावे म्हणून. ' तीन दिवस. मांसाशन बंद' असे ठराव करतात. यावरून त्यांची दृष्टी दिसते. फातमा, शाकाहारीच कर हं जेवण. खूप भाज्या कर ! ”

 "बाबा, माझी एक मैत्रीण आली आहे येथे लहानपणची ! तिलाही मी जेवायला बोलावले आहे. तिची आवडती भाजी करणार आहे. "दिलावर, टमाटो, कोबी, वगैरे आण हो. फळे आण. पोपया आण. आज बाबांना व माझ्या मैत्रिणीला मेजवानी !"

 दिलावर गोंधळला. तो निघाला बाजारात.

 "लौकर ये हैं दिलावर."

 "अच्छा ! ”

 दिलावर विचार करीत जात होता, ' फातेमाची ही कोण मैत्रीण ? तीच मुलगी. दुसरी कोण असणार ? तिने मला सारे सांगितलेच होते. ती मुलगी पळून पुन्हा फातमाला भेटली वाटते ?फातमाचा पत्ता तिला काय माहीत ? बरेच दिवसात तर त्यांचा पत्रव्यवहार नाही. त्या मोलकरणीने फातमास सांगितले का ?' तो विचारात मग्न होता. बाजारात त्याने आज खूप खरेदी केली. भाज्या, फळे, सर्व काही विकत घेऊन पाटीवाला करून तो घरी आला.

 "फातमा, काय करतेस ? "

 "पु-या तळीत आहे. दिलावर, श्रीखंड घेऊन ये. जा."

७० * चित्रा नि चारू