पान:चित्रा नि चारू.djvu/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दुस-या दिवशी सकाळी दिलावर मोटार घेऊन स्टेशनवर गेला. दुसरेही प्रतिष्ठित लोक त्याने बोलावले होते. हारतुरे होते. गाडी आली. आमदार हसन आले, दिलावर सामोरा गेला. लोकांनी हार घातले. पोर्टरने सामान उचलले. बाहेर मोटार तयार होती. मोटार निघाली.

 "दिलावर, काय काम आहे ?" आमदार हसन यांनी विचारले.

 "कसले काम ?"

 "फातमाच्या सहीची तार आली, की ' काही महत्त्वाचे काम आहे. ताबडतोब या.' म्हणून तर मी आलो, सारी कामे बाजूस ठेवून आलो."

 दिलावरला ही भानगड माहीत नव्हती. चित्राप्रकरण तर नाही ना ? तो दचकला.

 "काय बरे असेल काम ? " सास-याने पुन्हा विचारले.

 "ते मुस्लीम स्त्रियांच्या शिक्षणाचे काम असेल, फातमाने मुस्लीम स्त्रियांना साक्षर करण्यासाठी वर्ग सुरू केले आहेत. तिला ग्रँट वगैरे पाहिजे असेल, तेच काम असेल. मला तर तिने तार केली हे माहीतही नव्हते. ती मला इतकेच म्हणाली, की ' तुमची तार आली आहे व तुम्ही येत आहात.' घरी गेल्यावर कळेल."

 दारात मोटार वाजली. हसनसाहेब व दिलावर वर आले. फातमा सामोरी आली. पित्याने तिला जवळ घेतले.

 "बरी आहेस ना बेटा ?" त्याने प्रेमाने विचारले.

 "होय बाबा. बसा." ती म्हणाली.

 "काय ग, कसले काम ? " त्यांनी हसत विचारले.

 "मग जेवताना सांगेन. दिलावर, आज छान छान भाज्या आणा. आज हिंदूंच्या शाकाहारपद्धतीची मी रसोई करणार आहे. बाबा, तुम्हाला तसला स्वयंपाक आवडतो ना ? "

 "हो. पैगंबरसाहेबसुद्धा भाकरीच खात. फार तर मध घेत. कधी नुसता खजूर. माणसाने शक्यतो शाकाहारी असावे असे माझे मत आहे."

 "परंतु मांसाशनास इस्लाम बंदी नाही करीत."

आमदार हसन * ६९