पान:चित्रा नि चारू.djvu/६०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


नसे. त्याला डझनावारी कपडे लागत, आज ही टोपी घाली, उद्या दूसरी. आज गोंड्याची तर उद्या फेझ. आज हा सूट, उद्या तो. अत्तरांचा घमघमाट असायचा. मित्रांना हॉटेलांतून खाने द्यायचा. उदार म्हणून मिरवायचा.

 पैसे पुरे पडत ना, तेव्हा दिलावर हा बायकांचा धंदा करू लागला. पळवून आणलेल्या बायका तो विकत घेई व पुन्हा आणखी कोणाला नफ्याने विकी. बरा चालला होता धंदा.

 फातमाला या गोष्टी फारशा माहीत नव्हत्या, तिचे दिलावरवर प्रेम होते. दिलावर तसा स्वभावाने दुष्ट नव्हता. परंतु चैनीची चटक त्याला लागली होती आणि पैशांसाठी तो हे प्रकार करू लागला.

 त्याने एका खोलीत चित्राला ठेवले होते. चित्राच्या सेवेला त्याने एक मोलकरीण ठेवली होती. तिची तो काळजी घेई. रोज तिच्याकडे जाई.

 "सोडा मला. मी पाया पडते, माझा पती वाट पाहात असेल. आईबाप रडत असतील. दुःखाने वेडे होतील. दया करा. तुमचे नाव रहीम ना ? रहीम म्हणजे दया करणारा ना ? रहीम हे नाव लहानपणापासून मला आवडे."

 "तुम्हाला का मुसलमानी नावे आवडतात ? "

 "चांगली नावे कोणाला आवडणार नाहीत ? आणि माझी मुसलमान मैत्रीण होती. मी तिच्याकडे जात असे. किती माझ्यावर तिचे प्रेम. माझ्याजवळून तिने रामायण नेले होते. तिने मला 'इस्लामी संत' हे पुस्तक दिले होते. मुसलमान वाईट आहेत असे कोणी म्हटले, तर मी ते चांगले आहेत असे म्हणे आणि फातमा, तिचे आजोबा महंमदसाहेब यांचे उदाहरण मी देत असे. परंतु आज निराळाच अनुभव येत आहे. मुसलमानांचे नाव बद्दू नका करू. उज्ज्वळ करा. मला बहीण माना व सोडा, "

 " तुझ्या मैत्रिणीचे नाव काय फातमा ? "

 " ती तुम्हाला पत्र पाठवी ? "

६२ * चित्रा नि चारू