पान:चित्रा नि चारू.djvu/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "परंतु माल तर पाहू द्या." ते गि-हाईक म्हणाले.

 "माल खूपसुरत आहे. बहोत उमदा माल ! "

 "खरे सांगायचे, म्हणजे माल मलाही नको आहे. मी आणखी कोणाला विकीन. तू किती घेणार पैसे ? "

 "दोन हजार तरी द्या ! "

 "परंतु एकदा पाह दे ती मुलगी."

 "मुलगी म्हणजे रत्न आहे. मला तिची दया येते. खरोखरच गोड आहे ती मुलगी."

 तो गुंड व ते गि-हाईक चित्राच्या खोलीत आली. चित्रा घाबरली.

 "सोडा हो मला. तुम्ही का मला त्यांना विकणार ? "

 "हो,”

 "अरेरे. मी का बाजारी माल ? "

 "पोटासाठी, सारे पोटासाठी ! ”

 "हे तर श्रीमंत दिसतात. हेही का पोटासाठी मला विकत घेणार ?"

 "माझ्या चैनीसाठी तुला विकत घेणार आहे." ते गि-हाईक म्हणाले.

 "तुम्ही मुसलमान दिसता. खरोखरच का मुसलमान वाईट असतात ?"

 "आम्हाला बोलायला वेळ नाही."

 ते दोघे गेले. सौदा ठरला, रात्रीच्या वेळेस . एक मोटार आली. चित्राच्या तोंडात बोळा कोंबण्यात आला. तिच्या तोंडावर बुरखा घालण्यात आला. तिला खाली नेण्यात आले. मोटारीत घालण्यात आले. गेली मोटार.

 कोठे गेली चित्रा ? पुढे काय झाले तिचे ?

 त्या मुसलमानाचे खरे नाव होते दिलावर. परंतु त्याने खोटे नाव, घेतले होते, पण त्याला दिलावर म्हणूनच ओळखू. कोण हा दिलावर ?

 हा दिलावर फातमाचा नवरा. दिलावर उधळ्या होता. त्याला नेहमी पैशांची टंचाई असे. फातमा त्याला बोले. परंतु, त्याचा खर्च कमी होत

चित्राची कहाणी * ६१