पान:चित्रा नि चारू.djvu/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हजारभर रुपये मिळाले ते तो घेऊन आला. आपल्या नावाने पोस्टात त्याने ते ठेवले.

 भोजू घरी आला. त्याने सीताबाईस सारे सांगितले. त्या दत्तमंदिराचे त्याने रम्य वर्णन केले. सायंकाळी सुंदर आरती होते, नगारा वाजतो. टाळ, तास वाजतात. पुजारी भक्तिभावाने गोड गाणी म्हणतो. ते इस्पितळही जवळच, वेड्यांचे डॉक्टर फार सज्जन आहेत. सारे सारे त्याने सांगितले.

 सीताबाईंनी जायचे ठरवले.

 "येता ना ठाण्यास ? " भोजूने बळवंतरावांस विचारले.

 "ठाण्यास ? "

 "तेथे कशाला ? तेथे तुरुंग आहे. वेड्यांचे इस्पितळ आहे. मला का कलेक्टर तुरुंगात घालीत आहे ! का वेड्यांच्या इस्पितळात पाठवीत आहे ?"

 "तेथे चित्रा आहे. तेथे चित्राताई भेटेल.”

 "खरेच का ? तपास लागला तिचा ? "

 "असे कळले आहे."

 "चला तर मग, करा तयारी. वा-यावर बसून जाऊ. "

 "आगगाडीने जाऊ."

 "खरेच श्यामू, रामू, दामू वा-यावरून पडतील. तीसुद्धा येणार ना ? येईलच, ती येथे एकटी थोडीच राहणार ? चला, लवकर चला म्हणजे झाले."

 सर्व मंडळी ठाण्याला आली. त्या दत्तमंदिराच्या आवारात आली. तेथील मोफत दवाखान्याचे डॉक्टर भले गृहस्थ होते. त्यांची व वेड्याच्या दवाखान्यातील डॉक्टरांची ओळख होती. त्यांनी बळवंतरावांस मोटारीतून तिकडे नेले. बरोबर भोजू व सीताबाई होत्या.

 बळवंतरावांना दवाखान्यात ठेवण्यात आले. सीताबाई व भोजू परत घरी आली. हळूहळू सारी व्यवस्था लागली. सीताबाई दत्तासमोर सारख्या बसत व प्रार्थना करीत. भोजू सर्वांना धीर देत होता.

५८ * चित्रा नि चारू