पान:चित्रा नि चारू.djvu/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बसला. चित्राशी आपले भाग्य निगडित आहे असे त्यांना नेहमी वाटत असे. चित्रा जन्मली आणि ते एकदम मामलेदार झाले. चित्रा वाचली व पुढची मुले वाचू लागली. चित्रावर बळवंतरावांचे फार प्रेम होते. सीताबाईंचे तितके नव्हते. परंतु बळवंतरावांना चित्रा म्हणजे जणू आधार वाटे. रोज त्यांना चित्राची आठवण येई. जेवताना येई. कधी कोठे खेड्यात वनभोजन वगैरे कार्यक्रम असला म्हणजे येई. आणि आज हे पत्र. त्यांचे डोळे भरून आले. ते रडतच घरात गेले.

 "अग, आपली चित्रा हरवली. हे पत्र आले आहे." ते रडत म्हणाले.

 "काय. चित्रा हरवली ? ” सीताबाईंनी घाबरून विचारले.

 त्यांनी पत्र वाचून दाखविले. त्यांचा गळा दाटून आला होता.

 "तुम्ही जा शोधायला. रजा घ्या. अशी कशी हरवली ? कोणी पळवली वाटते ? आणि गेली कशाला त्या दुष्ट सासूच्या माहेरी ? तुम्ही रडत नका बसु. घ्या रजा नि ताबडतोब जा."

 बळवंतराव आपल्या बैठकीच्या जागी गेले. त्यांना काही सुचत नव्हते. त्यांनी तात्पुरती रजा घेऊन जास्त रजेचा अर्ज केला. ते आज जाणार होते. आधी गोडगावला जाणार होते. मग शोध करणार होते.

 " भोजू" त्यांनी गड्याला हाक मारली. भाजू फार प्रामाणिक नोकर होता. आज दोन-तीन वर्षे त्यांच्याकडे तो टिकला होता. चित्राचे लग्न झाले नि भोजू कामाला लागला. बळवंतरावांना भोजू गडी फार आवडे. त्यांचा त्याच्यावर फार विश्वास.

 "काय साहेब ? त्याने येऊन विचारले.

 "भोजू, मी गावाला जाणार आहे. आमची चित्र हरवली आहे. शोधायला जात आहे. तू घर सांभाळ. तुझ्यावर सोपवून जात आहे."

 "चित्राताई अशा कशा हरवल्या ? मी जाऊ का शोधायला ? मी आणतो त्यांना शोधून. जाऊ का ?"

 "भोजू, माझे प्रयत्न हरल्यावर तू जा."

 "सापडतील चित्राताई. माझे मन सांगते, की सापडतील."

 "तुझ्या तोंडात साखर पडो. निर्मळ व शुद्ध माणसांना सत्य कळते. माझी तयारी कर. वळकटी बांध. कपडे फार नकोत. समजलास ना ?"

चित्राचा शोध * ५१