पान:चित्रा नि चारू.djvu/४८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


शेवटी मला शोधीत त्या मळ्यात आली. हृदयाची भाषा तुला काय कळे! आई, चित्राविषयी खोट्या कड्या नको उठवू. शपथ आहे तुला. मी चालता होतो. चित्रा सापडली तर घरी परत येईन, नाही तर जीव देईन. प्राण नाही देववला तर कोठे हिमालयात निघून जाईन. हा माझा शेवटचा प्रणाम. बाबाना सांग. तेही बाहेरगावी गेले आहेत. त्यांना सांग, की चारू गेला, चित्राला शोधायला गेला. माझी चित्रा मला सापडेल. तरीच बुधवारी मला सारखे रडू येत होते आणि चित्रानेही पत्रात तसेच लिहिले आहे. आमची दोघांची हृदये एक आहेत, याचा हा घे पुरावा. एकाच दिवशी आमच्या दोघांच्या हृदयांस हुरहुर लागली होती. अशी माझी चित्रा, ती का कोणाचा हात धरून जाईल? आई, केवढे कुभांड तू रचीत आहेस ? निष्पाप व निर्मल मुलीला तू कलंक लावू पाहात आहेस. आई, हे पाप, घोर पाप आहे.कोठे हे फेडशील ? अरेरे! चित्रा, कोठे असशील तू ? टाहो फोडीत असशील, रडत असशील, कोठे तुला पाहू, कोणाला विचारू, कोठे शोधू ? आई, प्रणाम. चालला हो चारू." आणि चारू खरेच घर सोडून निघून गेला. त्याने चित्राच्या वडिलांना पुढीलप्रमाणे पत्र लिहिले-

  सेवेशी कृ. स. प्रणाम.
   चारू आज घर सोडून बाहेर पडत आहे. चित्रा कोठेतरी
  हरवली आहे. आईबरोबर ती आमच्या आजोळी गेली
  होती. परंतु एके दिवशी अकस्मात् ती हरवली. काय घोटाळा
  आहे समजत नाही. आई घरी आली ताबडतोब. मी चित्राच्या
  शोधार्थ बाहेर पडत आहे. चित्रा सापडली तरच घरी परत
  येईन. चित्रा सापडली तरच तुम्हालाही तोंड दाखवीन. मी दुःखी
  आहे. चित्रा म्हणजे माझे पंचप्राण. तिच्याशिवाय मी जगू
  शकणार नाही. देवाची इच्छा असेल तसे होईल.
      तुमचा अभागी
        चारू

 असे पत्र लिहून चारू चित्राच्या शोधार्थ जणू फकीर होऊन बाहेर पडला आणि ते पत्र चित्राच्या वडिलांना मिळाले. त्यांना धक्काच

५० * चित्रा नि चारू