पान:चित्रा नि चारू.djvu/४४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 चारूची आई एकटीच रडत ओरडत घरी आली.

 "काय झाले ? चित्रा कोठे आहे ? " सर्वांनी विचारले.

 "गेली हो. कोठे गेली ? मी आपली देवळात वाट पाहात आहे. हिचा पत्ता नाही. नदीवर हातपाय धुवायला म्हणून गेली. बराच वेळ झाला . मी जाऊन पाहात्ये, तो कोणी नाही. तेथे डोह वगैरे नाही. खळखळ वाहणारे गुडघाभर पाणी. कोठे गेली ? का कोणाबरोबर पळाली? चारूला मी नेहमी म्हणायची, को ही बया चांगली नाही म्हणून. परंतु तो लक्ष देत नसे. तो तिला सैल सोडी, चांगले चौदावे दाखवायला हवे होते. कोठे गेली कार्टी ? काळिमा फाशील सर्वांच्या तोंडाला. आता चारूला काय सांगू ? काय लिहू ? जा तुम्ही तरी. बघा कोठे सापडत्ये का ? " लोक शोधायला गावभर गेले. परंतु चित्राचा पत्ता नाही.

 " तिने कोणाजवळ काही ठरवलेले असावे." एकजण म्हणाला.

 "या गावात बाहेरगावचे पुष्कळ रंगेल तरुण येतात. दिसतात गुलजार, गेली असेल पळून. दिला असेल कोणी विडा !" आणखी कोणी म्हणाला, “आणि आज बुधवारी जायची गरज तरी होती ? मंगळवार शुक्रवारी गर्दी असते. तिला गर्दी नको होती. एकान्त हवा होता." तिसरा बडबडला.

 " मी तिला चांगली सांगत होत्ये को शुक्रवारी जाऊ. तर म्हणे कशी, की गर्दीत प्रार्थना मनापासून नाही करता येत. बुधवारीच जाऊ. अगदी एकटी जाणार होती. म्हणे कशी, कोणी नको बरोबर. परंतु मी म्हटले, की कोणी नको तर नको. परंतु मी येईन बरोबर. तिने कोणाजवळ तरी ठरवले असावे." चारूची आई म्हणाली.

 " हा शिक्षणाचा परिणाम." एक सदगृहस्थ उद्गारले.

 "आता चारूला कळवा." कोणी सुचवले.

 "काय, कळवा काय ?" एकाने विचारले.

 "कळवा, चित्रा कोणाचा हात धरून गेली. जाऊ दे, दुःखी होऊ नकोस. येथे दुसरी मुलगी तयार आहे, तुझ्या आईच्या मैत्रीणीची. तुझ्यासाठीच जणू तिचे अद्याप कोठे जमले नाही. देऊ बार उडवन, असे लिहा." एका शिष्टांनी तपकीर नाकात कोंबीत सांगितले.

चित्रा नि चारू.djvu

४६ * चित्रा नि चारू