पान:चित्रा नि चारू.djvu/४३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 प्रियतम चारू,

  काय रे तुला लिहूं ? तुझी आठवण अक्षरशः पदोपदी येते.

 देवीला आज जात आहे. मनोरथ पूर्ण होवोत. तू मला लवकर

 न्यायला. ये, तुझ्याशिवाय मला चैन नाही पडत. काही सुचत

 नाही. तुला पुष्कळ लिहावेसे वाटते. परंतु काय लिहूं ? किती

 लिहूं ?

  आज सारखे वाईट वाटत आहे. का बरे ? तू का माझी

 आठवण काढून रडत बसला आहेस ? वेड्या, रडू नकोस.

 बायका रडतात. पुरुषांना रडणे नाही हो शोभत. मला लवकर

 ने. मग आपण हसू. हो. ये लौकर.

      तुझी सदैव,

       चित्रा

 तिने पत्र पाकिटात घालून कोणाजवळ तरी टाकायला दिले.

 तिसरा प्रहर झाला, देवीला जायची तयारी झाली, खण, नारळ, वगैरे सारे घेण्यात आले. चारूची आई व चित्रा निघाल्या.

 "बरोबर गडी न्या." कोणी तरी म्हणाले.

 "कोणी नको, दोघी जाऊन येतो. भीती थोडीच आहे ?" चारूची आई म्हणाली.

 "गावातून दोधी बाहेर पडल्या. देवीच्या मंदिराचा रस्ता आता त्यांनी धरला. जरा दुतर्फा झाडी होती. रस्ता चांगला होता. मोटार जाईल असा रस्ता, इतक्यात हॉर्न वाजले, कोठे तरी मोटार आहे वाटते ?

 चालल्या दोघी पुढे. देवीचे मंदिर आले. तो जवळ एक मोटार उभी.

 चारूची आई व चित्रा मंदिरात गेल्या. परंतु इतक्यात चारूची आई काय म्हणाली, " चित्रा, ती खाली नदी आहे. तिच्या पाण्याने हातपाय धुवून ये जा. मग देवीची ओटी भर. जा बेटा."

 चित्राला खरे वाटले, ती मंदिरातून बाहेर पडली. इतक्यात कोणी तरी. एकदम तिच्या तोंडावर बुरखा टाकला. तिच्या तोंडात बोळा कोंबला गेला. ती थोडी ओरडली. धडपडली. परंतु त्या दांडग्या लांडग्यांनी त्या हरणीला घट्ट धरले. तिला मोटरीत टाकून ते पळून गेले.

चित्रावर संकट * ४५