पान:चित्रा नि चारू.djvu/३८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


होत लवकर मूल. म्हणून का कंटाळलीस ? का सासू काही म्हणाली ? होईल मूल. अजून का वय गेले? हे सतरावे वर्ष. चांगली हस, खेळ.मनाला नको बाई लावून घेऊ."

 चित्रा उठून गेली. माहेरी तो लोकरीचा फ्रॉक करीत होती. चारूसाठी फ्रॉक. त्यात तिचा वेळ जाई. फ्रॉक तयार झाला. सासरी जायची वेळ आली. चारू न्यायला आला होता. चार दिवस आनंदात गेले. मेजवानी झाली.

 " फ्रॉक घालून पाहा ना."

 "घरी गेल्यावर घालीन."

 "चारू, जेथे तू नि मी आहो तेथे आपले घरच. येथे आहोत ना आता दोघे, मग येथे घर. घाल. मला बघू दे."

 चारूने फ्रॉक घातला.

 "छान दिसतो तुला !"

 "आता कोणाला करशील ? "

 "पुढे कधी बाळ होईल, त्याला करीन. "

 "मला आला असता, तर मी तुझ्यासाठी केला असता. खरेच ! "

 "वेडा आहेस तू चारू. बायकांचा जन्म का नाही घेतलास ? "

 "पुढच्या जन्मी आपण अदलाबदल करू."

 "चारू, उद्या निघायचेच का ? "

 "झाले आता चार दिवस. पुरे नाही का ? "

 "होय हो, पुरे. जाऊ हो उद्या."

 चित्रा व चारू गोडगावला आलो. सासूबाईंचा स्वभाव अद्याप पूर्ववतच होता. चित्राला मूलबाळ होणार नाही, तू दुसरे लग्न कर, असा आग्रह सासूचा चारूला सुरू झाला होता. परंतु चारू तिकडे लक्ष देत नसे.

 परंतु अकस्मात् चमत्कार झाला. सासू आता फारच चांगली वागू लागली. चित्रावर पोटच्या मुलीवर करावी तशी माया सासूबाई करू लागल्या. त्यांनी तिच्यासाठी लाडू केले. तिला उजाडत लाडू खायला देत. तिला आता काम नसत सांगत. गोड बोलत. तिला जवळ घेत.

४० * चित्रा नि चारू