पान:चित्रा नि चारू.djvu/३४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 “हो. तू नाही तर मी गेले पाहिजे. मला जरा बरे नाही वाटत. तू ये जाऊन."

 "बरे."

 चित्राला वाईट वाटत होते. चारू तिला धीर देत होता.

 "चित्रा, तुलासुद्धा मी बरोबर नेले असते, परंतु ते बरे नाही दिसणार. मी लौकरच येईन. आईला सांगून ठेवीन. आणि जरा धीटपणाने वाग.आई बडबड करील तिकडे लक्ष नको देत जाऊ,हो."

 "चारू, तू जवळ नसलास म्हणजे माझा जीव खाली वर होतो. पाण्याविणे मासा तसे होते. तूच हो एक माझा आधार. तुझ्याशिवाय मला कोण आहे ? तू माझे जग, तू माझा देव. वाटते, की तु नि मी कोठे तरी दूर दूर जावे. नको हे जग, दुष्ट जग ! "

 "चित्रा, हे जग का दुष्ट आहे ? या जगातच तू नि मी आहोत. तुझी फातमा आहे. तुझे आईबाप, भावंडे, सारी आहेत. जगात बरे, वाईट सारे आहे. ब-याकडे लक्ष देऊन आशेने व आनंदाने राहावे, "

 "राहीन हो आनंदाने, ये जाऊन, "

 चारू गेला. चित्राची आता दीनवाणी स्थिती झाली. जहागीरदारही चार दिवस निर्मळपूरलाच औषधासाठी जाऊन राहिले. घरी केवळ सासूचे राज्य. चित्राचे हाल आता कुत्रा खाईना. तिला पहाटे सासू उठवी. खटाळभर भांडी घासायला लावी. धुणी धुवायला लावी. तिला शिळे खायला वाढी, दळायला लावी आणि शिव्या येता जाता आहेतच.

 रात्री बारा वाजता थकलीभागलेली चित्रा आपल्या शयनमंदिरात जाई. परंतु एके दिवशी सासू म्हणाली,

 "वर नाही निजायचे ! खालीच स्वयंपाकघरात झोपत जा. गाद्या हव्यात लोळायला. तो येईपर्यंत नाही वर झोपायचे. समजलीस ? त्या खोलीला मी कुलूपच लावत्ये," आणि खरेच त्या सासूने चित्राच्या खोलीला कुलूप लावले. क्षणभर जाऊन बसायला, रडायला जागाही नाही. स्वयंपाक घरातच तिला निजावे लागे. तेथे ओल असे. डांस असत. निजायला फटकूर मिळे. पांघरायलाही धड नाही. अरेरे, चित्रा. काय ही तुझी दशा !

३६ * चित्रा नि चारू