पान:चित्रा नि चारू.djvu/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 परंतु सासरा निर्मळपूरहून परत आला.

 " चित्रा, तुझ्या खोलीला कुलूपसे ? "

 "सासूबाई म्हणतात खालीच निजत जा."

 " दुष्ट आहे ही. मी सांगतो हो तिला. "

 आणि सास-याने सांगितले.

 "काही नको वर निजायला ! मला या मुलीचा काडीचा भरंवसा नाही. घरात तुम्ही नव्हतेत. चारू नाही. ही आपली दिवसासुद्धा वर जाऊन गादीवर लोळायची. लाजच नाही मेलीला. म्हणून कुलूपच लावले. वर गेलीस तर तंगडी तोडीन म्हटले. खाली अस माझ्या डोळ्यांसमोर, उद्या काही केलेन् नि तोंडाला काळे फासलेन् तर करता काय ? यांचे होतील खेळ, आपली मान खाली. तुम्ही म्हणत असाल तर उघडत्ये कुलूप. लोळे की नाही ! माझे काय जाते ? आणखी म्हणावं चार गाद्या घाल."

 चित्राचे मंदिर उघडले. त्या दिवशी रात्री चारूचा फोटो जवळ घेऊन ती रडली.

 "चारू, ये रे लौकर परत. तू येईपर्यंत मी जिवंत तरी राहीन की नाही कोणास ठाऊक ! परंतु तुझ्यासाठी मला जगले पाहिजे. मी गेल्यावर तू रडशील, दुःखी होशील, जगेन हो. तुझ्यासाठी जगेन चारू, तुझाच एक मला आधार आहे हो."

 असे त्या फोटोला हृदयाशी धरून ती म्हणत होतो.

 चित्रा अशक्त झाली, आजाऱ्यासारखी दिसू लागली. परंतु चारू आला. चित्राची दशा पाहून त्याला वाईट वाटले.

 "चित्रा, आईने तुझे हाल केले. होय ना ?"

 "नाही हो चारू. ज्या मातेच्या पोटी तुझ्यासारखे रत्न आले, तिला मी कशी नाव ठेवू ? सासूबाईंचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. तुझी देणगी त्यांनी मला दिली आहे. त्यांनी किती छळले, कितो त्रास दिला, तरी तो मला गोड करून घेतला पाहिजे. कारण तुझे जीवन त्यांनी मला दिले आहे चारूचे पृथ्वीमोलाचे रत्न जिने माझ्या पदरात घातले, तिला मला दोन शब्द बोलण्याचा अधिकार आहे. खरे ना चारू?"

सासूने चालवलेला छळ * ३७