पान:चित्रा नि चारू.djvu/३२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 "ताई, आम्ही चाललो. "

 "आता भाऊबीजेला या." ती म्हणाली.

 "तूच ये आमच्याकडे. तुझ्याकडे आम्ही आलो तर तुझी सासू मारील. ताई, मारकुटी आहे का ग ती ? तुला खरेच तो मारते ?" रामूने विचारले.

 "नाही हो मारीत. त्यासुद्धा आता प्रेम करतात माझ्यावर. असे बोलत नका जाऊ हो कोठे." अणि चित्रा उठून गेली. आई जवळ गेली. सीताबाई आवराआवर करीत होत्या.

 "चित्रे, सांभाळ हो. सासूचा स्वभाव निवळेल हो. असतात काही खाष्ट सास्वा. परंतु पुढे त्याही चांगल्या वागू लागतात. तुला मूलबाळ झाले म्हणजे सारे ठोक होई. आजच्या मांडीवर नातवंड खेळू लागले म्हणजे नातवंडाची आईहो मग आवडू लागते. "

 " आई, तू चिता नको करू. मला किती त्रास झाला तरी चारू दोन शब्द बोलला, की मी पुन्हा हसू लागते."

 " असेच तुमचे प्रेम राहो."

 इतक्यात चारू तेथे आला.

 "आमची चित्रा सांभाळा हो." सीताबाई म्हणाल्या.

 "मला सांभाळण्यापेक्षा तिला अधिक सांभाळीन, खरे ना चित्रा ? "

 " खरे हो."

 " चित्रा, चल आपण स्टेशनवर पुढे जाऊ. तिकिटे काढू. येतेस ?"

 "चला जाऊ."

 दोघे स्टेशनवर गेली. त्यांनी तिकिटे काढली. सामान आले, काही आधीचं पाठवून दिले होते मालगाडीने. हे सारे बरोबर न्यायचे होते. मंडळी सारी आली. गावातीलही काही मंडळी आली होती. शिपाई आले होते. बळवंतराव लोकप्रिय होते. निरोप द्यायला शेवटी शेवटी बरीच गर्दी झाली, कोणी माळाही घातल्या. कोणी भेटी आयत्या वेळेस आणल्या. आता थोडा होता वेळ. श्यामू , रामू ,दामू, बसले गाडीत. सीताबाई बसल्या. बळवंतरावही बसले.

 चित्रा व चारू खाली उभी होती. शिट्टी झाली.

३४ चित्रा नि चारू