पान:चित्रा नि चारू.djvu/३१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


अशा ओव्या चालल्या होत्या. तो सासूबाई आल्या.

 झालं का ग दळण ? आणि हे काय? चारू, तू का दळत बसलास ? अरे, तुला लाज कशी नाही ? इतका काय बाईलवडा ! साहेब नि मड्डम जणू ! दळू दे तिला. काही मरत नाही पसाभर दळून. ऊठ. सारा गाव तोंडात शेण घालील, गडीमाणसे काय म्हणतील ? आणि हिने तुला बोलावले असेल, लाज नाही मेलीला. केव्हाचे दळायला दिले आहे. तरी सांगितले होते तीनतीनदा बजावून, की, तो शेतावरून यायच्या आधी आटप म्हणून, ऊठ हो."

 "आई, अग दळले ज़रा म्हणून काय झालं ? व्यायाम होतो."

 "इतके दिवस नाही कधी दळायला आलास तो. आईला हात लावला होतास का दळताना कधी. बायकोवर माया. काल आली नाही तर तिच्याबरोबर दळायला लागला. आईने जन्मभर खस्ता खाल्या त्याचे काहीच नाही."

 "चारू, जा हो तू." हळूच चित्रा दुःखाने म्हणाली. चारू उठून गेला. चित्रा दळत बसली. तिनं कसेबसे दळण संपवले, आज तिच्या हाताला खरेच फोड आले. पुन्हा दुपारी भाडी घासायची. फोड झोंबत.चित्राला रडू येई.

 असे दिवस जात होते आणि त्यातच दुःखाची गोष्ट म्हणजे चित्राच्या वडिलांचीही दूर बदली झाली. त्या दिवशी ती माहेरी गेली होती. वडील जाणार होते. सारी भावंडे जाणार होती. चारूही आला होता.

 "आजच येतेस का ? "

 " आज नको. पण मला न्या हो."

 " नेईन हो बाळ, तुझे कसे चालले आहे? सासूबाई आताशा कशा वागतात ? "

 "सासूबाईंशीं मला काय करायचे आहे ? माझे माणूस मोलाचे आहे. लाखात असे सापडायचे नाही. बाबा, खरेच हो, चारू म्हणजे प्रेमसिंधू आहे. तुम्ही काळजी नका करू. पत्र पाठवीत जा हा मला."

 "पाठवीन हो."

 इतक्यात श्यामू, रामू, दामू आले.

सासूने चालवलेला छळ * ३३