पान:चित्रा नि चारू.djvu/१४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 आणि तसा एकदा योग आला. जहागीरदारांनीच बोलावले; कारण एकदा बळवंतराव सहज त्यांच्याजवळ म्हणाले होते, " तुमच्या मळ्यात भरीत-भाकरीचा जमवा बोवा एकदा बेत. मी आमची चित्रा पण घेऊन येईन. खेडेगाव पाहाण्याचा तिला फार नाद. " जहागीरदार ती गोष्ट विसरले नव्हते.

 जहागीरदारांकडची गाडी आली. बळवंतराव निघाले. चित्राही निघाली. आज त्यांनी बरोबर दुसरे कोणी घेतले नाही. दामू, रामू,श्यामू सारे पाठीस लागले, परंतु सीताबाईंनी त्यांची समजूत घातली.

 "ताईला दाखवायला नेत आहेत वाटते? " श्यामूने हसून विचारले.

 "अय्या, होय का ग आई ?" रामूने टाळी वाजवून म्हटले.

 "चाहाटळ आहात. चला घरात ! " सीताबाई म्हणाल्या.

 बळवंतराव व चित्रा गोडगावच्या मळ्यात आली. फारच सुंदर होता मळा. प्रसन्न वाटत होते. मळ्यात एक लहानशी बंगली होती. तिच्या दिवाणखान्यात बैठक होती. बळवंतरावांचे जहागीरदारांनी स्वागत केले.

 " बाबा. मी बाहेरच हिंडते. मला नाही असे आत आवडत." असे म्हणून चित्रा बाहेर गेली.

 तिकडे चारू बाहेर होता. फुले तोडून गुच्छ करीत होता. चित्राने चारूकडे पाहिले. त्याने तिच्याकडे पाहिले. कोणी बोलले नाही, परंतु थोड्या वेळाने-!

 “ मला छान करता येतो गुच्छ. मी करू का ? " चित्राने विचारले.

 " परंतु तुम्हाला देण्यासाठी तर मी करीत आहे. पाहुणेमंडळींचे स्वागत करायला हवे. बाबांनी मला सांगितले, गुच्छ कर म्हणून. "

 " तुम्ही आम्हाला गुच्छ द्या, आम्ही तुम्हाला देऊ."

 "परंतु आमचीच फुले घेऊन आम्हाला देणार वाटते ? तुमच्याकडे आम्हाला बोलवा व द्या मग गुच्छ,"

 "आम्ही बोलावले तर तुम्ही याल ?"

 "परंतु तुमचे वडील मामलेदार, खेड्यातील लोकांना मामलेदार का घरी पाहुणचारास बोलावतील? "

१६ * चित्रा नि चारू