पान:चित्रा नि चारू.djvu/१३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 " आणि लग्न नाही का करायचे ? "

 "आई व बाबा आहेत. त्यांना ती काळजी."

 अशी बोलणी चालली आहेत, तो जहागीरदार आले.

 "काय हो, यांचे लग्न नाही का करणार ? "

 "हो, आता करायला हवेच. चारूच 'इतक्यात नको' असे म्हणतो. त्याच्या आईने पाहिली आहे एक मुलगी. तिच्या एका मैत्रिणीची मुलगी आहे. चारूचे त्या मुलीजवळच लग्न लावावे असे तिला वाटते. होय ना रे चारू?"

 "परंतु मला नको ती मुलगी. मी आजोळी गेलो होतो, तेव्हा पाहिली होती. आईचा उगीच हट्ट. त्या मुलीजवळ लग्न लावण्याऐवजी मी असाच राहीन. "

 " परंतु, अरे, दुस-या मुली.येतील."

 "अहो, चांगल्या मुलाकडे मुलींचे आईबाप खेप घालतात."

 "खरे आहे."

 अशी बोलणी झाली. मामलेदार गावात हिंडून लोकांच्या तक्रारी वगैरे ऐकून निर्मळपूरला परत गेले. बळवंतरावांनी चारू आवडला. हा जावई बरा असे त्यांना वाटले. त्यांनी घरी गोष्ट काढली.

 " विचारून पाहू का ? तुला काय वाटते ? " बळवंतरावांनी पत्नीला विचारले.

 "परंतु फार शिकलेला नाही ना ? " सीताबाई म्हणाल्या.

 "कशाला हवे शिकायला ? नोकरीचाकरी करण्याची जरूरी नाही. अाणि वाचून ज्ञान मिळविण्याइतका तो शिकला आहे. त्याच्या घरी सुंदर ग्रंथालय आहे. गावातील लोकांनाही रात्री शिकवतो. मोठा छान, मुलगा. गुणी व सुस्वभावी आणि दिसायला खरोखरच मदनासारखा आहे.”

 "परंतु आमची चित्रा त्यांना पसंत पडेल का ? "

 "मी एकदा चित्राला घेऊन त्यांच्या मळ्यात जाणार आहे. बघू या कसे जमते ते."

 "बघावी नाडीपरीक्षा."

चित्रेचे लग्न * १५