पान:चित्रा नि चारू.djvu/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "फातमा, थांब. शेवटचा फराळ करून जा. मी घेऊन येते हैं. येथे बैस."

 चित्रा खाली गेली. आईजवळून तिने चकल्या, लाडू, वगैरे फराळाचे सामान आणले. लिंबाचे सरबत तिने केले होते. दोघी मैत्रिणींनी फराळ केला. दोघी सरबत प्यायल्या.

 "जाते आता चित्रा."

 "हे घे रामायण."

 "तुला मी विसरणार नाही."

  फातमा गेली. चित्रा एकटीच आता खोलीत बसली होती. 'खरेच का आपलेही लग्न बाबा लवकर करणार?' ती विचार करीत होती, परंतु तिला तो विचार आवडला नाही.

 "चित्रा, स्टेशनवर येतेस का ?" बळवंतरावांनी विचारले.

 "कशाला?"

 "अग, ते महंमदसाहेब आज जाणार आहेत."

 "उद्या ना जाणार होते ?"

 "नाही, आजचे जात आहेत. तुझी फातमा आली होती ना ? तिने नाही का सांगितले ? "

 " तिला नक्की दिवस माहीत नव्हता."

 "चल. तुझ्या मैत्रिणीला निरोप दे."

 "बाबा, फातमास मी काय देऊ ? "

 " काय देतेस ? "

 "तिला एखादी सुंदर ओढणी घेऊन दिली असती."

 "खरंच. छान होईल, मी मागवतो हो."

 आणि बळवंतरावांनी एका दुकानातून सुंदर रेशमी ओढणी ताबडतोब मागवून घेतली. चित्राला ती आवडली. पित्याबरोबर ती स्टेशनवर गेली.

 "रावसाहेब, आपण कशाला आलेत मुद्दाम ? ' फौजदारसाहेब म्हणाले.

 "मित्र म्हणून आलो. रावसाहेब म्हणून नव्हे. आणि चित्रालाही यायचे होते. "

१२ * चित्रा नि चारू