पान:चित्रा नि चारू.djvu/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " परंतु तुझे आजोबा आईची आठवण नाही ना येऊ देत ?”

 "होय चित्रा, पैगंबरांचे आईबापही लहानपणीच वारले. ते पोरके होते. पोरक्या मुलांविषयी पैगंबरांना फार प्रेम वाटे. कुराणात पुन्हा पुन्हा सांगितले आहे, की ' पोरक्या मुलांना फसवू नका. त्यांची इस्टेट लुबाडू नका, त्यांना प्रेम द्या,' आजोबा मला प्रेम देत आहेत."

 "तुझ्या वडिलांचे तुझ्यावर प्रेम नाही का?"

 "आहे. परंतु ते दूर असतात, मला कपडे पाठवतात. खाऊ, पुस्तके पाठवतात. आता मी त्यांच्याकडेच जाणार आहे. सावत्र आईजवळ. चित्रा, लवकरच माझे लग्न होईल. बाबा. लग्न करणारच माझे यंदा."

 "तुझे वडील खरेच का निवडणुकीस उभे राहाणार आहेत ?"

 "हो. त्यांना फार नाद. हजारो रुपये खर्च करतात निवडणुकीसाठी."

 "ते कोणत्या पक्षाचे आहेत ?"

 "ते स्वतंत्र पक्षाचे."

 "परंतु कोणत्या तरी पक्षाचे असल्याशिवाय लोक मते देत नाहीत.”

 "बाबा नेहमी निवडून येतात. ते उदार आहेत. सर्वांना मदत करतात. ते पक्षातीत आहेत. ते सर्वांचे मित्र आहेत. त्यांना शत्रू नाही. ते म्हणतात, मी निवडणुकोत कधी पडणार नाही. एकदा पडलो तर पुन्हा उभा राहाणार नाही."

 "फातमा, तुला मी काय देऊ? कोणती भेट देऊ? "

 " तुझे ते मराठी संक्षिप्त रामायण मला भेट दे. मला फार आवडते राम-सीतेची गोष्ट. "

 "दुसरे काही माग."

 "काय मागू ? असेच प्रेम ठेव. मुसलमान म्हणजे वाईट असे नको समजू. जे असे म्हणतील त्यांना सांग, की माझी एक मुसलमान मैत्रीण आहे. तिचे नाव 'फातमा.' ती माझ्यावर प्रेम करी. चित्रा, हिंदुमुसलमानांची भांडणे ऐकून तुला वाईट नाही वाटत ? "

 "फातमा, आपण लहान मुली काय करणार ? "

 "जेवढे होईल तेवढे करू, चित्रा, तुला मी ' इस्लामी संत' हे पुस्तक भेट म्हणून देईन. ती माझी तुला आठवण."

महंमदसाहेबांची बदली * ११