पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४२ ) चमत्कार २ रा. श्रीमोरया आपल्या गुरुच्या आज्ञेवरून अनुष्ठानाकरितां मोरगांवाहून थेउरास जात असतां वाटेंत लागणाऱ्या आठ कोसांवरच्या एका डोंगरावर एक महान् भुजंग वस्ति करून राहत असे; असें वृत्त त्यांचे कर्णी आलें. तो सर्प मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना दंश करून त्यांचा प्राण घेत असे. त्यामुळे कोणीही प्रवासी तिकडून जाण्यास बहुधा धजत नसत, असे असतांही श्रीमोरया त्याच वाटेनें श्रीमंगलमूर्तीचें नामस्मरण करीत चालले. सर्पानें ते जवळ आले असें पाहून एकदम फूत्कार करून त्यांचे आंगावर उडी घेतली. व त्यांच्या पायास कडकडून दंश केला. परंतु श्रीमोरया भजनरंगांत अगदी गुंग होऊन गेल्यामुळे त्यांची वृत्ति-"ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहातें सांभाळी" याप्रमाणें झाली होती ह्मणून सर्पदंशाचें त्यांना मानही नव्हतें. मग विषबाधा कोठून होणार ? परिसाचा स्पर्श लोहास होतांच जसें त्याचें सुवर्ण बनतें. तसें मोरयांच्या पदरजस्पर्शानें त्या भुजंगाला आपल्या पूर्वजन्मींच्या ज्ञानाची जागृति झाली. व त्यानें आपला दुष्ट देह श्रीमोरयांचे चरणीं विसर्जन करून मुक्ति घेतली व उद्धरून गेला. चमत्कार ३ रा. व्याघ्र शिलारूप झाला. श्रीमोरयांनी थेऊर येथें गेल्यावर अनुष्ठानास आरंभ केला.