पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





   कै० जावजी दादाजी चौधरी.   ७१

___________________________________________________________________

जर विद्या असती तर ते नेतेही झाले असते. तसा योग आला असता तर कर्तृत्व

व नेतृत्व यांची एकच ठिकाणीं उत्कृष्ट सांगड झाली असती. तथापि

जावजींना नेते पुरुष फारच उत्कृष्ट मिळाले. त्यांनींच जावजींस बऱ्याचशा

अंशाने इतक्या उच्चत्वास चढविलें असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

पण, जावजींचे अंगी जर कर्तृत्वगुण नसता तर या नेत्या लोकांचे हातून काय

उपयोग झाला असता ? 'की नामस्पर्शमणि स्पर्शे परि काय करिल खापर मी, '

असें जें पंतांनी मोठ्या मार्मिकतेने म्हटलें आहे तोच प्रकार जर जावजी कर्ते

नसते तर या नेत्यांच्या खटपटीचा झाला नसता काय ? तेव्हां आम्ही या कर्त्या

व नेत्या अशा उभयविध पुरुषांची मनोभावें तारीफ करतों.

 अंधपंगुन्यायानें या कर्त्या व नेत्या पुरुषांचा संयोग आह्मां सर्वोस मोठा लाभ-

दायी झाला आहे. या जावजींच्या कर्तृत्वशक्तीची उदाहरणें अन्यगुणसंबंधाने

बरींचशीं सांगण्यांत आली आहेत. विलायतेंत जशा ग्रन्थकारांकडून पुस्तकें

घेऊन प्रसिद्ध करणाऱ्या कंपन्या आहेत तसला प्रकार आमचेकडे जावजींनी

प्रथमतः सुरू केला असा आमचा समज आहे. जावजींच्या कर्तेपणाचे दुसरें

उदाहरण-व यांतील यशाचे भागीदार फार कोणी नसावेत ह्यटले ह्मणजे मुद्रण-

कलेत व प्राच्य भाषाक्षरघटनेंत जी अपूर्व हृदयाह्लादक व अत्यंत अभीष्ट अशी

सुधारणा केली आहे ती होय.

 जावजींची लौकिक व्यवहारांत व कुटुंबव्यवहारांत वृत्ति अगदीं निगवीं

व साधी होती. लक्ष्मीच्या योगानें ते उन्मत्त झाले असते तर त्यांत फारसा

दोष ठेवण्यास जागा नव्हती. ज्याला मोठयांतला मोठा पगार जितका मिळत

होता त्याच गृहस्थाची त्या पगाराचे शेंदीडशेपट दरमहा पगार वांटण्याची

स्थिति येऊन त्यानें लक्ष्मीच्या मदाचे सपाट्यांत न सापडतां पूर्वी सारखेच साधें

रहावें हें कशाचें दर्शक आहे बरें? लक्ष्मीच्या मदाचा तडाखा किती जबरदस्त

आहे याचे वर्णन एका संस्कृत कवीने असे केले आहे की, इतर प्रकारचे मद कांहीं

कालावधिपुरतेच असतात व ते उन्मादकद्रव्याचें सेवन करणान्यापुरतेच असतात.

पण लक्ष्मीच्या मदाची गोष्ट अगदी निराळी आहे. जो या द्रव्याचें सेवन करतो तो

तर उन्मत्त होतोच पण त्याचे दूरदूरचे संसर्गीही पण अगदीं उल्लू बनून जातात.

हा मद पिढ्यान्पिढ्या चालतो. हा कैफ इतका कांही चमत्कारिक आहे की जन्म-