पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





७०   चार चरित्रात्मक लेख.

_______________________________________________________

 'जे कां रंजले गांजले । त्यांसी ह्मणे जो आपुले ।

 तोची साधु ओळखावा । देव तेथेंची जाणावा ॥

  'अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ ।

  त्याचे गळां माळ असो नसो ॥

  परद्रव्या अंध निंदेसी जो मुका ।

  तोचि संत देखा तुका ह्मणे ॥ '

ह्रीं व या सारखी प्रापंचिक व लौकिक साधूंची इतर लक्षणें जीं तुकोबासारख्यांनीं

वर्णन केली आहेत तीं जावजींस पूर्णपणें लागू होती, असें ज्या कोणास त्या

पुण्य पुरुषाचा कांही काळ समागम झाला आहे त्याला खचित वाटल्यावांचून

रहाणार नाही. त्यांचा सर्व आयुष्यक्रम ह्या साधुत्वलक्षणांनीं ओतप्रोत भरला

होता. जीं कांहीं थोडींशी उदाहरणें रा० सा० ओकर्ना दिली आहेत त्यांवरून

जावजींच्या पूर्ण साधुत्वाची साक्ष पटत नाही काय? असे व्यावहारिक, प्रापंचिक

व लौकिक साधु आमच्या मध्ये जितके अधिक उत्पन्न होतील तितके हवे आहेत.

जेव्हां करवीरचे संबंधानें केसरीकारांवर मुकद्दमा येथील प्रेसिडेन्सी म्याजिस्ट्रेट

साहेबांपुढे चालला होता तेव्हां त्यांच्याकरितां जावजी जामीन राहिले होते ही

गोष्ट सुप्रसिद्ध आहे. दीनबंधुकाराचे जातीचे जावजी असून या अपरिचित

ब्राह्मणछाव्यांस यथाशक्ति साहाय्य करतात ही गोष्ट 'जे कां रंजले गांजले ।

त्यासी ह्मणे जो आपुले' या लक्षणाचा कृतितः अनुवाद करीत नाहीं काय ? बाल-

बोधांतील चरित्रांत नुसते गुणप्रकाशन असतें व दोषोद्घाटन नसतें, व तसें

होण्याचें कारण जावजी होत, असे रा० सा० ओक ह्मणतात. बरें ही तरी गोष्ट

कशाची दर्शक असावी ? ' निंदेसी जो मुका' या लक्षणाची जावजींचे कृतींवर

किती छाप होती हैं या गोष्टविरून स्पष्ट होत नाहीं काय ? जावजींचे एकंदर

आचार, विचार व उच्चार यांची जर कोणी छान करील तर आम्हास वाटतें कीं,

त्या छान करणाऱ्या पुरुषाला जावजी ह्मणजे एक अवतारी पुण्यपुरुष, व योगभ्रष्ट

ह्मणून पुन: अवतीर्ण झालेला महासाधु असे असावे असें नि:संदेह वाटेल.

 देशाला ऊर्जितावस्था येण्यास कर्ते पुरुष पाहिजेत. कर्त्या पुरुषांचीच जिकडे

तिकडे वाण आहे. कार्ये करायाचीं पुष्कळ आहेत, पण तीं करणारे पुरुषांचीच फार

तूट आहे. आमचे सुदैवानें जावजी हे एक चांगले कर्ते पुरुष होते. जावजींना