पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





६८    चार चरित्रात्मक लेख.

___________________________________________________________

राहिला. हे दोन गुण जर जावजींचे अंगीं नसते किंवा असूनही फारच थोड्या

प्रमाणानें असते तर त्यांची आजच्या इतकी कीर्ति झाली नसती. मुंबईतील

आमचे देशी छापखानेवाले पुष्कळ आहेत, व जावजींच्या आधींचेही बरेच

असतील, पण जावजींच्या इतका त्यांचा लौकिक नाहीं याचें बीज या दोन

गुणांचा अभाव किंवा अल्पप्रमाणक सद्भाव हें असावे असे आह्मांस वाटतें.

जावजी हे स्वतः शिकले सवरलेले नव्हते, ह्मणजे त्यांस विद्वान् कोटींत

समाविष्ट करतां येण्याजोगी त्यांची योग्यता नव्हती, हें सुप्रसिद्ध आहे. ते कधीही

आपण विद्वान् आहोत असे समजत नसत. ते जरी इतक्या मोठ्या योग्यतेस

चढले होते तरी पण त्यांना गर्वलेशही नव्हता. ते आपली स्वतःची योग्यता

पूर्ण जाणून होते व त्याप्रमाणे त्यांचें सदा वर्तन असे. नाहीं तर अर्ध्या हळकुंडानें

पिवळी होणारी मंडळी पुष्कळ दृष्टीस पडते. त्यांतील ते अगदी नव्हते असें

अनेकवेळां प्रत्ययास आले आहे. जेव्हां बडोदे सरकाराकडून बालबोधाची तारीफ

झाली व मुंबई सरकारानें जावजी शेटचा 'जस्टिस आफ दि पीस' ही पदवी

देऊन मान केला, तेव्हां त्या दोहों प्रसंगींचे त्यांचे उद्गार त्यांचे निगर्वीपणाची व

ते स्वत:स चांगले ओळखीत या गोष्टीची चांगली साक्ष देत आहेत. याहून अन्य

उदाहरणें नकोत.

 आतां जावजींची सामाजिक, धार्मिक व नैतिक विषयांविषयीं अमुक त-हेची

मतें होती व त्यांचे विचार अमुक दिशेचे होते असे त्यांच्या चरित्रकारांनी ह्म-

टलें आहे. आमच्या दृष्टीने हा केवळ अर्थवाद आहे. जावजींची स्वतंत्र मतें

किंवा विचार असतील किंवा नाही याची आह्मांस शंका आहे. त्यांचे विचार व

मतें ही त्यांच्या विश्वास्यांची मतें व विचार होत असा आमचा अनुभविक ग्रह

आहे. एकदा अमुक बाबतीत अमुक विश्वासपात्र आहे अशी जावजींच्या परीक्षेस

उतरून खात्री झाली कीं, मग त्याच्यावर त्या कामी त्यांचा पूर्ण विश्वास असे.

त्या कामी त्याच्या धोरणानें ते वागत. तेव्हां त्यांच्या विचारांचा व मतांचा रंग

विश्वास्यांच्या मतांच्या व विचारांच्या रंगाप्रमाणे असे. यांचे विश्वास्य बहुतेक

ब्राह्मण होते, ह्मणून त्यांच्या मतांचा, विचारांचा व आचारांचा थाट ब्राह्मणी

थाटाचा होता. जावजी हे जातीचे मराठे व सत्यशोधक समाज हा मराठ्यांत

उत्पन्न झालेला. त्या समाजाचे अग्रणी व धुरीण हे जावजींचे मित्र होते. पण ते

जावजींचे परक्षित उतरले असावे असा रंग दिसत नाहीं; कारण यांच्या मतांची