पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कै· जनार्दन वाळाजी मोडक, बी. ए.  ३७

ळच मजकूर मिळेल, यांत आम्हाला अगदीं शंका नाहीं. आतां नुकताच स्वत

आह्मांला या जनार्दनपंतांच्या अभिनंदनीय गुणाचा खासा प्रत्यय आला, व

तो पाहून आह्मी जसे त्या वेळी थक्क झालों तसे आमचे वाचकही तो ऐकून

थक्क होतील अशी आमची खात्री आहे. परवां विविधज्ञानविस्ताराला २१ वें वर्ष

संपून २२ वें वर्ष लागलें, त्यावेळी या पुस्तकाचा इतक्या वर्षांचा त्रोटकसा

इतिहास द्यावा असे मनांत येऊन त्या संबंधाची सामुग्री एकत्र करूं लागलों तों

असे आढळले की, आह्मांजवळ (ह्मणजे तो लेख लिहिणाराजवळ ) पहिल्या

कांहीं वर्षाचे विविधज्ञानविस्ताराचे अंकच नाहींत, व संनिधवर्ती अशा कांही अगदी

जुन्या आश्रयदात्यांजवळही नाहींत असे शोधाअंती कळलें. परंतु जनार्दन

पंतांचा हा गुण ज्याला माहित होता अशा एका मित्राच्या सूचनेवरून त्यांच्या-

जवळ शोध करितां नुसते आह्मांस पाहिजे ते अंक मिळाले इतकेंच नव्हे, पण

कांहीं कांही इतरत्र दुर्लभ अशी माहितीही मिळाली. हा परिणाम केवळ त्यांचा

जो स्वभाव की कोणतीही वस्तु किंवा ज्ञान म्हणून जीं लब्ध होतील ती आपलीं-

शीं करून, ती योग्य स्थळी काळजीपूर्वक जपून ठेवावयाची, त्याचा होय. जना-

र्दनपंतांचा हा गुण किंवा इतर दुसरे स्पृहणीय गुण यांत लोकोत्तरत्व कांही

नाहीं हें खरें. तथापि ते बहुतेक लोकांना जरी सोपे वाटतात, तरी लब्ध होत

नाहींत. पदार्थाच्या दौर्लभ्यावरून व कष्टसाध्यत्वावरून त्या पदार्थाची किंमत

वाढत असते. लोकोत्तर नसूनही बहुतेक लोकांस दुर्लभ असे सद्गुण मोडकांचे

अंगी पुष्कळच होते, ह्मणूनच त्यांची विशेष तारीफ करणे रास्त आहे. असो.

 मोडकांच्या विद्यार्थिदशेचे वर्णन करीत असतां बऱ्याच लेखकांनी जनार्दनपंतांनी

आपला अभ्यासाचा खर्च आपल्या वडील माणसांवर पडू दिला नाहीं, व तो

स्कालरशिप्स् वगैरेंवर चालविला असें कटाक्षपूर्वक लिहिले आहे. हे त्यांचे

लिहिणें यथार्थ आहे, पण या गोष्टीवर कटाक्ष ठेवण्याचे कारण नव्हतें. कारण

जनार्दनपंत हे ज्यावेळी शाळेत किंवा पाठशाळेत अध्ययन करीत होते, त्या

वेळीं व त्याकाळचे पूर्वीही शेकडा पंचाण्णव विद्यार्थी गरीब स्थितीतील होते

ह्मणजे त्यांच्या घरच्या मंडळीची त्यांच्या अध्ययनार्थ लागणारा खर्च पुरवि-

ण्यासारखी स्थिति नव्हती. 'दांत आहेत तेथें चणे नाहींत, व चणे आहेत

तेथें दांत नाहींत' ही रड आजकालची नाहीं. ही सनातनची स्थिति आहे.

तेव्हां सधन लोकांचीं मुलें विद्याव्यासंगांत गुंतलेलीं तेव्हां नव्हतीं, व आतांही