पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३६  चार चरित्रात्मक लेख.

_____________________________________________________________

 जनार्दनपंतांचा इंग्रजी अभ्यास अव्वल अखेर पुण्यासच हायस्कूल व कॉलेज

यांत झाला. त्यांची सन १८६६ सालीं प्रवेशपरीक्षा उतरली व सन १८७०

सालीं ते बी. ए. चे परीक्षेत उत्तीर्ण झाले. ही परीक्षा झाली, किंवा कांहींकांचे

मतें एल्. एल्. बी. परीक्षा उतरली, ह्मणजे विद्यार्थिदशा सर्वस्वी संपली असें

समजण्याचा प्रघात आहे, व तो खरा असल्याचें या उपपदधारी मंडळींच्या पुढील

आयुःक्रमावरून सिद्ध होतें. त्याशिवाय विश्वविद्यालयाचे वार्षिक पदवीदानाचे समा-

रंभ होत असतात, त्यावेळी बहुतेक असा उपदेश पदवी घेणारांस करण्यांत येत

असतो की, पदवी संपादन केली एवढ्यावरूनच त्यांनी आपणांस कृतार्थ समजूं नये;

पण त्यांनी इतकेंच समजावें कीं सरस्वतीमंदिरांत प्रवेश होण्याजोगी त्यांच्या अंगी

योग्यता आली आहे. जर सदरचा समज खरा नसता तर वारंवार या उपदेश-

पुनरुक्तीचे प्रयोजनच नव्हते. पण स्थूळ मानाने पाहतां हा समज अनुभवसिद्ध

आहे. परंतु या अनुभवाला अपवाद नाहींत असे मात्र नाही. जनार्दनपंत हे ह्या

अपवादकोटीतील एक ठळक उदाहरण आहेत. त्यांची विद्यार्थिदशा यावज्जीव चा-

लूच होती. यांना आमरणांत विद्यार्जनसंबंधानें आपण कृतार्थ झालों असे कधी

वाटलेच नाहीं. सदा त्यांचा विद्याव्यासंग चालूच होता. कधी त्यांनी याला खळ

ह्मणून पडूं दिलाच नाही. विश्वविद्यालयांतील अभ्यासक्रम संपल्यावर, ज्योतिष-

शास्त्रादि ज्या गहन विषयांचे ज्ञान वालबोध करण्याकरितां ते सदा यत्न करीत

होते, ते विषय शिकण्याचे त्यांनी सुरू करून, त्यांत पारंगतता संपादिली. तेव्हां

त्यांची विद्यार्थिदशा कधीं संपली नाहीं व ते परमेश्वरकृपेनें जितके दिवस

आणखी वाचते, तितका काळपर्यंत ती संपली नसती. या विद्यार्थिदशेचें वृत्त

संपविण्यापूर्वी आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. विद्यार्थिजनांस अत्यंत

आवश्यक खरा, पण फार दुर्मिळ गुण जी टापटीप व सुरेख व्यवस्था करण्याची

शिस्त ही यांच्या अंगी इतकी खिळलेली दृष्टीस पडते कीं, यांच्या जवळ शाळेत

असतांना शिकण्याची पुस्तकें संग्रही जपून ठेविली आहेत; इतकेंच नव्हे, पण

त्यावेळचीं टिप्पण-पुस्तकें (Note-books ) सुद्धां तितक्याच काळजीनें

त्यांनी जपून ठेविली आहेत. आतां यांच्या प्रौढ विद्यार्थिदशेंतील टांचणवह्या

शिल्लक असतीलच हैं सांगणें कशास? ह्या टांचणवह्या व टिप्पणवह्या जर यांच्याच

तोडीच्या कोणा प्रौढ विद्यार्थ्याच्या हाती लागतील, तर ' बहुत जनां शहाणे

करून सोडण्याच्या कामी उपयोगी पडेल असा या हस्तलिखित वह्यांतून पुष्क-