पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कै० जनार्दन वाळाजी मोडक, बी.ए.  ३५

______________________________________________________________

बाळाजीपंत हे सोलापूर जिल्ह्यांत बारशी येथें मामलेदार होते, त्यावेळी जनार्द-

नपंत हे आपल्या बापाजवळ राहण्यास गेले. तेथील सरकारी मराठी शाळेत

जनोबांच्या मराठी शिक्षणास आरंभ झाला असे ह्मणण्यास हरकत नाहीं. यांचे

सहाध्यायांपैकी बारशीस अद्यापि कोणी कोणी आहेत, त्यांच्या सांगण्यांत आहे की

जनोबाची बुद्धि लहानपणीं अति तीव्र होती असे जरी नाहीं, तरी चांगली सतेज

होती. परंतु विशेषतः ध्यानांत ठेवण्यासारखे यांचे गुण हाटले ह्मणजे साधेपणा

सरळपणा व निरभिमान हे होत. यांचा विशेष उल्लेख करण्याचें कारण, व्यवहा-

रांत नित्यशः अरों दृष्टीस पडतें कीं, अधिकार व त्याच्या खालोखाल धनिकता

ही तत्तद्विशिष्ट व्यक्तींसच काय ती उन्मत्त करतात असे नाही, परंतु संसर्गानें

ज्यांच्याकडे त्यांचे वारें जातें त्यांस तर ती फारच उन्मत्त करतात. हा अनुभव

'सार्वत्रिक व रोजचा असल्यामुळे त्याची उदाहरणांनी सिद्धता करणें नलगे.

त्याच तत्त्वानुरूप शाळेत देखील मुलांची त्यांच्या बापांच्या अधिकारमानाप्रमाणें

अरेरावी चालते. परंतु आमच्या जनोवाचें शाळेत वर्तन इतकें सरळ व साधें

असे कीं ते सदरील तत्त्वास जबरदस्त अपवादक ह्मणून कबूल केले पाहिजे.

हे त्यांचे गुण मोठेपणीही तसेच राहिले इतकेंच नव्हे, पण ते वृद्धीस पावले व

परिपक्क झाले. जनार्दनपंतांचे वडील बेळगांव व धारवाड जिल्ह्यांत मामलतींचे

कामावर असतांना तेही पण तिकडे जाऊन राहिले होते असे दिसतें, व त्याच योगानें

त्यांना कानडी भाषा येऊं लागली. ती ते वुद्धिमान् व ज्ञानबुभुत्सु असल्यामुळे

नुसती शिल्लक राहिली नसून जरी त्यांना पुढे ह्मणजे प्रौढ वयांत तिचा तादृश

उपयोग पडला नाहीं, तथापि ती त्यांचेजवळ चांगलीच ताजी राहिली होती.

इंग्रजी शिकण्याकरितां ते पुण्यास येऊन राहिल्यापासून त्यांस कर्नाटक

प्रांतांत रहाण्याचा प्रसंगच आला नाही. त्यांचा सर्व काळ मराठी जिल्ह्यांतच

नोकरी करण्यांत गेला. तथापि त्यांनी कानडीला हातचें सोडून दिलें

नाहीं. यावरून त्यांच्या बुद्धीच्या ग्रहणशक्तीची व धारणाशक्तीची

चांगली अटकळ बांधतां येते. नाहीं तर असे कांहीं लोक आढळांत

येतात कीं, ते चार दिवस परमुलखांत जाऊन व राहून आले ह्मणजे लागलीच

आपली जन्मभाषा देखील विसरतात किंवा विसरल्यासारखें दाखवितात. जेथें

जन्मभाषेचा हा प्रकार तेथें नवीन शिकलेल्या भाषांचें काय होत असेल यावि-

षयी प्रश्न करण्यास अवकाशच रहात नाहीं. असो.