पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कै.सौभाग्यवती डाक्टर आनंदीबाई जोशी.  २७

नशीब त्या बिचाऱ्याचें ! नगाऱ्याच्या घाईपुढे टिमकीची काय प्रतिष्ठा ? जिथें

सर्व देशाचें नुकसान झालें तिथें आमच्या मित्राच्या नुकसानीची कथा काय ?

परमेशाधीन गोष्टीला कोणाचा इलाज नाहीं. तथापि ज्या गोष्टीला इलाज आहे

त्या तरी सर्वांनी कराव्या. आनंदीबाई तर गेलीच, पण तिने स्वाचरणाने घालून

दिलेला कित्ता ज्यांस शक्य असेल अशा आमच्या देशभगिनींनीं वळवावा,

अशी प्रार्थना करून, आमच्या सौभाग्यशालिनी डाक्टर आनंदीबाई इच्या

कीर्तिरूप देहावर मोगऱ्याच्या फुलांचा हार घालण्याची परवानगी मागून हा

आमचा गद्य भाग आटपतों.

   श्लोक.

 भती शक्य नसो तुझा सुरनदी आणावया भूवरी;

 कैवारार्थ करो तुझ्या न धरणी निक्षत्रिया श्रीहरी;

 गाया त्वगुणे यापुढे न दुसरा उत्पन्न हो वाल्मिकी;

 कोणी राम तुझी करो न गणना त्या कन्यकापंचकीं;  

 कर्तव्यीं चुकला नसो यम तुझ्या मोहोनि बाक्पाटवा;

 अंकीं खेळविलीं नसोत कुतुकें ब्रह्मादि वाळें तुवां;

 आले हांसवितां मृता तुज नसो; किंवा नसो संगरीं

 कोणी पाहियलें तुला तळपतां विद्युल्लतेच्यापरी.  

 जेव्हां प्रश्न परी करील मजला कोणी कधीं कीं, - यशा

 गावें संतत ज्यांचिया कविवरीं व्यासादिकींही अशा

 आल्या कोण पतिव्रता सुचरिता जन्मास ह्या भारती ?

 आनंदी ! पहिली तुझीच मजला होईल तेव्हां स्मृति.  

 'पातिव्रत्याच रक्षिलें निजगृहीं बैसोनियां आपलें

 ‘ स्त्रीचें ऐहिक सर्वथैव हाणजे कर्तव्य आटोपलें-

 ऐसें लोक सुखें ह्मणोत, ह्मणतां येई न मातें तसें;

 होवो होत असेल यास्तव तरी लोकांत माझें हसें.  

_____________________________________________________________

१. अहिल्येच्या प्रमाणे. २. द्रौपदांच्या प्रमाणे. ३. सीतेच्या सारखे. ४. तारा- मंदोदरीप्रमाणे. ५. सावित्रीच्या प्रमाणे ६. अनुसूयेसारखीं. ७. सुलोचनेप्रमाणे. ८ झांशांचे राणीसारखी.