पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ही काळाची गरज आहे. पण हे घडवून आणण्यासाठी स्त्रिया जितक्या निर्धाराने उठतील आणि आघाडी बांधतील तितका त्यांचा विजय सहज सुलभ होणार आहे. कारण त्यांचे शत्रू समाजातील असुरक्षितता, भीती हे आहेत.
 स्त्री-मुक्ती म्हणजेच भीतीवर मात. ही मात केल्यानंतरच विज्ञानतंत्रज्ञानाच्या नव्या युगात स्त्री स्वतःच्या अधिकाराने पाऊल टाकू शकेल.
 नवी पहाट
 शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने स्त्रियांच्या दास्याच्या मूळ कारणाविरुद्ध एका बाजूला आघाडी उघडली जात आहे. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला एका नव्या तंत्रज्ञानाच्या युगाची पहाट होत आहे. पाशवी शक्तीच्या जोरावर चालणारी आर्थिक व्यवस्था आणि तंत्रज्ञान दोन्ही मागे पडत आहेत आणि नव्या युगाला लागणारे सर्व गुण, हजारो वर्षांच्या गुलामगिरीची किंमत मोजून, कमावलेली स्त्री पुढे येत आहे. "इंडिया"तील स्त्रियांसमवेत आघाडी बांधून या नव्या युगाचे पाईक होण्याची संधी साधणे हे आजच्या महिला आघाडीचे सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट असेल.

(प्रथम प्रकाशन : नोव्हेंबर १९८६)

■ ■

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ७६