पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अगदी स्त्री स्त्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींतही हे प्रमाण सारखे नसते आणि एकत्र काम करणाऱ्या दोन भावांतही.
 या वेगवेगळ्या जीवशास्त्रीय किंवा जीवशास्त्रांशी संबंधित घटकांपेक्षाही समाज-अर्थशास्त्रीय घटक हे जास्त निर्णायक महत्त्वाचे ठरतात. जीवसृष्टीतील खालच्या पायरीत शरीररचना आणि भोवतालची परिस्थितीच प्राण्याचे भवितव्य बहुतांशी ठरवते. मनुष्यासारख्या उत्क्रांत योनीत आनुवंशिक उपलब्धींपेक्षा जन्मानंतरची परिस्थिती आणि प्रयत्न यांचा परिणाम अनेक पटींनी जास्त मोठा.
 श्रमविभागणी
 समाजातील कामांची श्रमविभागणी कशी होते? आजपर्यंतच्या बहुतेक समाजातील स्त्री आणि पुरुष यांच्यामधील श्रमविभागणी ही व्यक्तीव्यक्तींच्या गुणवत्तेनुसार न होता ठोकळेबाजपणे, लिंगभेदाच्या आधारे झाली. स्त्री- पुरुषांत मूलतः फरक थोडा. जे गुण पुरुषाचे म्हणून मानले जातात त्या गुणांतही अनेक स्त्रिया बहुतेक पुरुषांना वरचढ असतात. हे लक्षात घेऊनही सरसकट सर्व स्त्रियांची एकाच प्रकारच्या कामावर योजना करण्याची अशास्त्रीय, अकार्यक्षम पद्धती बहुतेक समाजांनी अवलंबली आहे. अनेक गबाळ पुरुष जबाबदारीच्या जागेवर जातात आणि कर्तबगार स्त्रिया आयुष्यात कधीतरी येणाऱ्या बाळंपणाच्या कारणाने 'चूल व मूल' यात अडकून जातात. ही परिस्थिती आजपर्यंतच्या अजागळ समाजाला परवडली, उद्याच्या वैज्ञानिक समाजाला न परवडणारी आहे.
 समाजात वापरली जाणारी उत्पादनाची साधने कोणत्या प्रकारची? ती हाताळण्याला शारीरिक ताकदीचा कितपत उपयोग? आर्थिक प्रगती कितपत झालेली? समाजातील सर्वसाधारण पोषणाची पातळी काय? राहणीमानाचा दर्जा काय? आणि समाजातील सर्वसाधारण व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या कक्षांची लांबी, रुंदी काय? यावरूनही स्त्रीचे समाजातील स्थान ठरू शकेल. प्रत्येक स्त्रीचे स्थान तिचे व्यक्तिगत गुण आणि आवडीनिवडीनुसार ठरले तर अन्यायाला आणि तक्रारींना वाव राहणारच नाही. सरसकट सर्व स्त्रियांना लागू होणारा नियम त्यांच्यावर अन्याय करणाराच ठरेल.


 ४. स्त्री चळवळीची विविध रूपे

 पाश्चिमात्य देशांतील स्त्रियांची चळवळ ही प्रामुख्याने स्त्रियांनीच उभी केली. अमेरिकेतील गुलामगिरीच्या विरोधातील आंदोलन उभे करण्यात स्त्रियांचा फार मोठा सहभाग होता. १९२० साली स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ५३