पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

याकरिता अमेरिकेत एक व्यापक आंदोलन झाले. इंग्लंडसारख्या लोकशाहीच्या माहेरघरात मतांचा हक्क मागणाऱ्या स्त्रियांवर पोलिसांनी लाठ्याही चालविल्या होत्या. आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या या देशांत, जेथे सर्व स्त्रिया किमान साक्षरतरी होत्या अशा देशांत ही स्थिती.
 भारतातील करुणावाद
 गेल्या शतकाच्या शेवटाला आपल्या देशात इंग्रजांचा अंमल स्थिर झाला. त्या वेळी देशातील यच्चयावत् स्त्रियांची स्थिती जितकी हलाखीची आणि करुणास्पद होती तितकी ती इतर कोठे वा कधी झाली नसेल. बाकी कोणाला असो नसो, स्त्रियांना मात्र इंग्रजी राज्य हे ईश्वराचे परम वरदान ठरले. आजही शरीयतसारख्या प्रश्नावर जी खळखळ माजते ती पाहता, इंग्रजी अमलात एका मागोमाग एक झपाट्याने झालेले कायदे पाहिले तर कौतुक वाटल्याखेरीज राहत नाही. १८२९ मध्ये सती-बंदीचा कायदा झाला आणि विधवांना सक्तीने जाळण्याला बंदी घातली गेली. १८५६ साली हिंदू विधवांच्या पुनर्विवाहासाठी आवश्यक तो कायदा अमलात आला. १८७२ साली घटस्फोटाची तरतूद करण्यात आली. १९२९ साली 'शारदा' कायदा मंजूर होऊन बालविवाह हा गुन्हा ठरविण्यात आला.

 या सर्व काळात राजा राममोहन रॉय, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळराव आगरकर, हरविलास सारडा, बाबा पदमनजी अश्या मंडळींनी स्त्रियांचे प्रश्न पुढे मांडले. पण स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याकरिता एका मागोमाग एक कायदे होत गेले तसतसे नवनवीन प्रश्नही समोर येऊ लागले किंवा जुन्या प्रश्नांचे स्वरूप नव्या गंभीरतेने पुढे येऊ लागले. १९४६ साली द्विभार्याप्रतिबंधक कायदा झाला. स्वातंत्र्यानंतरही विवाहाची नोंदणी, हुंडाप्रतिबंध, हिंदू वारसा कायदा आणि हिंदू कोड बिलाच्या संबंधाने अनेक कायदेशीर तरतुदी कायद्याच्या पुस्तकात तयार झाल्या. घटनेने स्त्रियांना समान हक्क दिले. देशाच्या पंतप्रधानपदीसुद्धा एक स्त्री विराजमान झाली. पण व्यवहारात सर्वसामान्य स्त्रीच्या दृष्टीने फरक काहीच न पडल्यासारखा आहे. विधवा आता सती सर्रास जात नाहीत पण अजूनही सतीच्या घटना वर्तमानपत्रात अधूनमधून ऐकू येतात आणि सतीच्या स्थळी हजारो, लाखो लोक भक्तिभावाने जमतात. बालविवाहाचा कायदा होऊन ६० वर्षे झाली पण अजूनही ग्रामीण भागातील जवळजवळ सर्व लग्ने हा कायदा मोडून होतात. स्त्रियांना मालमत्तेचा हक्क मिळाला पण परिणाम एवढाच झाला की लग्नाच्या वेळी प्रत्येक मुलीकडून बापाच्या मालमत्तेवरील हक्क सोडून दिल्याचे कागदोपत्री लिहून घेतले जाऊ

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ५४