पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हे दोन्ही कसोटीचे काळ स्त्रियांच्या दृष्टीने कमी कठीण होतील.
 (६) अगदी निर्बुद्ध म्हटल्या जाणाऱ्या म्हशीची रेडकेसुद्धा जन्मत:च चारही पायांवर बागडण्याइतकी बुद्धी घेऊन जन्मतात. बुद्धिमान माणसांची पोरे जन्माच्या वेळी निव्वळ गोळे, त्यांना पायावर उभे करण्यातच वर्ष निघून जाते. चालते- बोलते करेपर्यंत काही वर्षे आणि व्यावहारिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे करीपर्यंत आई-वडिलांचे निम्मे आयुष्य निघून जाते. मुलांच्या जोपासनेचा हा काळ अनेक दृष्टींनी निर्णायक महत्त्वाचा आहे.
 (७) युद्धासारख्या एखाद्या कारणाने स्त्रीपुरुषांचे समाजातील समसमान प्रमाण बिघडले तर त्यामुळे सर्व समाजातील आर्थिक, सामाजिक, अगदी नैतिक घडीसुद्धा बिघडून जाईल. उदाहरणार्थ, पुरुषांचे प्रमाण बदलले तर त्यांचे स्थान अजून उंचावेल.
 कामजीवनातील बदल
 मनुष्यप्राण्याचे कामजीवन म्हणजे अगदी जगाच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत जसेच्या तसे राहाते असे नाही. बदल ही एकच गोष्ट कायम आहे. स्त्री असणे किंवा पुरुष असणे हा संप्रेरकांच्या टक्केवारीचा प्रश्न आहे असे एकदा मान्य केले की या टक्केवारीचे परस्परप्रमाण इतिहासात सदासर्वकाळ तेच ते राहिले असे समजण्यास काही कारण नाही. वन्यपशुंशी दररोज सामना पडणाऱ्या शिकाऱ्याच्या शरीरातील पुरुष संप्रेरांचे प्रमाण, सकाळी १० ते ५ कचेरीत खर्डेघाशी करणाऱ्या त्याच्या वंशजांशी जुळण्याचे काहीच कारण नाही. हिंसाचाराच्या दडपणाखाली दररोज जगणाऱ्या प्राचीन महिलेच्या आणि आधुनिक पुरंध्रीच्या शरीरातील संप्रेरके एकच असणे संभव नाही. किंबहुना, मानववंशाचा इतिहास हा स्त्रियांच्या वाढत्या पुरुषीकरणाचा आणि पुरुषांच्या वाढत्या स्त्रीकरणाचा इतिहास आहे असेही काहीजण मानतात. कदाचित इतिहासाची गती स्त्री-पुरुषांच्या समानतेच्या दिशेनेच असेल असे नाही. चक्रनेमिक्रमाने स्त्री-पुरुष काही काळात एकमेकांपासून प्रवृत्तीने विभक्त होत जातात आणि परत काही काळानंतर प्रवृत्तीने एकमेकांच्या जवळ येतात असेही मानता येईल. अर्धनारीनटेश्वर आळीपाळीने दोन्ही प्रवृत्तींचे धृवीकरण आणि विलीनीकरण करतो असेही मानता येईल. बदलाचे स्वरूप काही असो, बदल होत राहतो हे निश्चित.

 कालपरिस्थितीनुसार वेगवेगळ्या वंशांत, राष्ट्रांत कामजीवनाचाही आविष्कार वेगवेगळ्या तऱ्हेने होतो. आग्नेय आशियातील समाजसंस्थांविषयी आणि तेथील स्त्रियांविषयी "सॉमरसेट मॉम"ने केलेले लिखाण या दृष्टीने अभ्यासनीय आहे.

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ५२