पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गरीब वर्गातील मुलांची आणि मुलींची सरसरी उंची वयाच्या चौथ्या वर्षी अनुक्रमे ९३.६ आणि ९३.१ सेंमी होती. अत्यंत संपन्न गटात हेच प्रमाण १००.५ आणि ९८.९ सेंमी होते. थोडक्यात, संपन्न गटातील मुली विपन्न गटातील मुलांपेक्षा चांगल्या ५ सेंमी ने अधिक उंच होत्या. अश्याच तऱ्हेची प्रवृत्ती वजनाच्या बाबतीतही दिसते. पण वयात आल्यानंतर संपन्न गटातील मुली उंचीने आणि वजनाने गरीब गटातील मुलांच्या तुलनेने मोठ्या असल्या तरी संपन्न गटातील मुलांपेक्षा आकारमानाने लहानच राहिल्या.
 शारीरिक सामर्थ्य
 पुरुषाचे हृदय आणि फुफ्फुसे आकाराने जास्त मोठी असतात. त्यामुळे, सर्वसाधारण पुरुषाची कार्यशक्ती ही सर्वसाधारण स्त्रीच्या तुलनेने जास्त असते. पण याचा अर्थ सर्व पुरुषांची कार्यशक्ती सर्व स्त्रियांच्या कार्यशक्तीपेक्षा उजवी असते असे नाही. कित्येक स्त्रिया या बाबतीत बहुतेक पुरुषांना वरचढ असतात. १९८२ साली दिल्लीत झालेल्या एशियाड क्रीडा स्पर्धेतील पुरुषांचे उच्चांक ऑलिंपिक स्पर्धेतील स्त्रियांच्या उच्चांकापेक्षा कमी प्रतीचेच होते. स्त्रिया क्रीडा क्षेत्रात येऊन फार थोडी वर्षे झाली तरी ही स्थिती आहे. आणखी काही कालानंतर स्त्रिया क्रीडाक्षेत्रातही पुरुषांच्या फारश्या मागे राहणार नाहीत.
 ताकद आणि कार्यशक्ती याबाबत पुरुषांना जो काही लाभ निसर्गाकडून मिळाला असेल तो असो. पण याउलट, भूक सहन करणे, सोशिकता, चिकाटी, रोगाची प्रतिकारशक्ती, शांतपणा या अनेक गुणांत स्त्रिया सरस भरतात. परिणामतः, ससा आणि कासवाच्या शर्यतीच्या गोष्टीप्रमाणे आयुष्याची शर्यत जिंकण्यात स्त्रियाच यशस्वी होतात. अगदी गर्भावस्थेपासून पुरुष-गर्भ हा नाजूक असतो. एका अभ्यासानुसार, गर्भधारणेच्या वेळी मुली व मुलगे यांचे प्रमाण १००:१२४ असे असते. वेगवेगळ्या कारणांनी गर्भावस्थेत आणि जन्मानंतर मुलांचे मृत्यूचे प्रमाण जास्त राहाते आणि त्यामुळे ३५व्या वर्षांपर्यंत स्त्रिया आणि पुरुष यांची संख्या समसमान होते. ७० वर्षांपर्यंत जगण्याची शक्यता स्त्रियांच्याबाबतीत ७५ टक्के आहे तर पुरुषांच्या बाबतीत ती ५७ टक्के आहे.
 मातृत्व - वरदान आणि शापही

 निसर्गाने स्त्रीवर टाकलेल्या मातृत्वाच्या जबाबदारीमुळे तर स्त्री ही वंशसातत्याच्या दृष्टीने श्रेष्ठच राहते. कोणत्याही पशुपालनात मादीचे महत्त्व अधिक असते हे उघडच आहे. निसर्गाच्या या देणगीमुळे स्त्री काहीशी अडचणीतही सापडते. मासिक पाळी, गर्भारपण, बाळंतपण, मुलांची जोपासना

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ४८