पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुरुष यांच्यातील फरक परत टक्केवारीचाच आहे.
 हा विषय तसा शास्त्रीय आणि गुंतागुंतीचा आहे. पण एवढी माहिती आणखी लक्षात ठेवायला हवी की उत्क्रांतीच्या प्रवाहात मनुष्य प्राणी हा काही त्याच्या शरीरातील रसायनांचा गुलाम राहत नाही. शरीरातील संप्रेरके बदलली की माकडाची वर्तणूक आपोआप बदलते. तसे मनुष्यप्राण्याचे होत नाही. समाजात वावरणारे स्त्री-पुरुष हे संप्रेरकांच्या प्रेरणांवर आवश्यकतेनुसार मातही करू शकतात. म्हणजे थोडक्यात, जीवशास्त्राने स्त्री-पुरुषांत केलेला फरक हा किरकोळ आहे.
 आकारमानातील फरक
 स्त्री ही अबला आहे, कमकुवत आहे; पुरुष हा सशक्त आहे, स्त्रीरूपी वेलीला पुरुषरूपी वृक्षाची गरज आहे असा समजही सार्वत्रिक आहे. स्त्रिया आणि पुरुष यांच्या उंचीत आणि आकारमानात फरक असतो. १९व्या वर्षी सुखवस्तू घरातील मुलामुलींच्या उंचीत १२ सें.मी. चा तर वजनात ७ किलोचा फरक आपल्या देशातील एका पाहणीत १९७२ साली आढळला. अगदीच जन्मताही मुली त्यांच्या भावांपेक्षा उंचीने थोड्या कमी असतात. त्यानंतर, वयात येण्याच्या आधी काही काळ त्या मुलग्यांच्या तुलनेने जास्त उंच होतात. पंधरा वर्षांच्या वयानंतर मुले उंचीच्या बाबतीत पुन्हा पुढे सरकतात. एक गंमत अशी की आजही काही भटक्या जमातीत स्त्रिया उंचीने आणि आकारमानाने त्याच जमातीतील पुरुषांपेक्षा वरचढ असतात. सर्वसाधारपणे, आदिवासी टोळ्यांतील स्त्री-पुरुषांच्या आकारमानात तफावत खूपच कमी आढळते. याउलट, नागरी संस्कृतीत ही तफावत सर्वात जास्त आढळते. एक तर्क असाही मांडला जातो की इतिहासाच्या एका काळात वन्य पशुंच्या टोळीतल्याप्रमाणे दांडगट पुरुष आपला हक्क प्राधान्याने बजावून घेत असल्यामुळे लहान आकामानांच्या पुरुषांची संतती संख्येने कमी राहिली. परिणामतः पुरुषसंततीचं आकारमान स्त्रियांच्या तुलनेने वाढते राहिले. वेगवेगळ्या कारणांमुळे स्त्रियाच आपल्यापेक्षा आकारमानाने वरचढ जोडीदार पसंत करीत असल्यामुळे आकारमानातील पुरुषांचे श्रेष्ठत्व आजही टिकून आहे. पण, यदाकदाचित एखाद्या समाजातील तमाम स्त्रियांनी आपल्यापेक्षा लहान आकारमानाचे जोडीदार स्वीकाराचे ठरविले आणि तो निर्णय अंमलात आणता आला तर दोनअडीचशे वर्षांच्या कालावधीत पुरुषांचे आकारमान स्त्रियांपेक्षा लहानखोर होऊन जाईल.

 आकारमानाचा संबंध प्रत्यक्षात लिंगभेदापेक्षा पोषणाच्या सकसतेवर अवलंबून दिसतो. उदाहरणार्थ, वर उल्लेख केलेल्या १९७२ सालच्या अभ्यासात अत्यंत

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ४७