पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या अवस्थांत तिची हालचाल मंदावते आणि स्वसंरक्षणाची शक्ती मर्यादित होते. साहजिकच, या काळात निवारा आणि संरक्षण यांची तिला विशेष आवश्यकता असते.
 बौद्धिक ताकद
 शारीरिक सामर्थ्याबाबत जी गोष्ट तीच मेंदूच्या कामाबाबत म्हणजे बुद्धीबाबत. शारीरिक वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांत मुली मुलांपेक्षा वरचढ ठरतात. असामान्य बुद्धिमत्तेमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जास्त, पण त्याबरोबर अतिमंद बुद्धीतही स्त्रियांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जास्त. सर्वसाधारणपणे, स्त्रिया बुद्धिमत्तेच्या सरासरी पातळीच्या जवळपास राहतात. याचाच अर्थ असा की बहुसंख्य स्त्रिया या अर्ध्याअधिक पुरुषांपेक्षा बुद्धिमत्तेने श्रेष्ठ असतात. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आजपर्यंत सर्वोच्च बुद्धिनिर्देशांक नोंदवलेल्या दोनही व्यक्ती मुली होत्या.
 बालपणात अगदी आरंभीच्या काळात शब्दाने अर्थ व्यक्त करण्याची प्रतिभा मुली सहज संपादन करतात. मुलांना हे सहसा जमत नाही. पण एक दोन वर्षांच्या अवधीनंतर मुलांना मूर्त स्वरूपातील वस्तू हाताळण्याचे कौशल्य चांगले जमून जाते. हे मितिज्ञान संपादन करण्याच्या भानगडीत मुली फारशा पडत नाहीत कारण शब्दप्रतिभेने त्यांच्या सर्व गरजा पुऱ्या होत असतात. कोणत्याही कारणाने का होईना, काही प्रमाणात मुले मितिज्ञानात उजवी, तर मुली शब्दसामर्थ्यात उजव्या ठरू शकतात. घरची किंवा समाजातील परिस्थिती संपन्न असली तर मितिज्ञानातील ही तफावत कमी होते. याउलट, हिंदुस्थानसारख्या दरिद्री देशात मितिज्ञानाच्या बाबतीत मुली विशेष मागासलेल्या असतात. पोषण आणि शिक्षण यांनी भरून काढण्यासारखी ही त्रुटी आहे.
 हिंसाचार

 एका क्षेत्रात मात्र पुरुषांची बरोबरी करण्याचे स्त्रियांनी फारसे प्रयत्न केल्याचे दिसत नाहीत. प्रत्येक देशाच्या इतिहासामध्ये समरागंणावर शौर्य गाजविलेल्या अनेक रणरागिणींची नावे नोंदली गेली आहेत पण तरीही हालचालींमधील चपलता, कार्यशक्ती, आक्रमकता आणि एक प्रकारची बेफिकीरी यामुळे हाणामारी आणि हिंसाचाराच्या कामात पुरुष जास्त सुलभतेने भाग घेऊ शकतात. स्त्रिया याबाबतीत, विशेषतः प्रजननाच्या जबाबदारीच्या काळात, मागे पडतात. एवढेच नव्हे तर, या काळात मागे म्हटल्याप्रमाणे, त्यांना निवारा आणि संरक्षण यांची गरज असल्यामुळे पुरुषांवर अवलंबून राहणे, विशेषतः धामधुमीच्या काळात त्यांना आवश्यक वाटते.

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ४९