पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जोड्यांतील प्रत्येक जोडीतील दोन्ही गुणसूत्रे, स्त्रियांप्रमाणेच, एकाच प्रकारची असतात. म्हणजे २३ पैकी २२ गुणात स्त्री आणि पुरुष यांत काहीच फरक नाही. फक्त स्त्रियांमधील २३व्या जोडीतील गुणसूत्रे (x, X) असतील, तर पुरुषाच्या २३व्या जोडीतील (x, Y) असतात. गर्भबांधणीच्या वेळी स्त्रीच्या प्रत्येक जोडीतील एक आणि पुरुषाच्या प्रत्येक जोडीतील एक गुणसूत्र एकत्र येऊन गर्भपेशीच्या २३ जोड्या तयार होतात. त्यातील २३ वी जोडी बनताना पुरुषाच्या २३व्या जोडीतील X गुणसूत्राची निवड झाली तर स्त्रीलिंगी गर्भपेशी बनते आणि Y गुणसूत्राची निवड झाली तर पुल्लिंगी गर्भपेशी बनते. म्हणजे गर्भाच्या बांधणीकरिता जी ४६ गुणसूत्रे एकत्र येतात त्यापैकी लिंग ठरविण्यासाठी केवळ एकच गुणसूत्र कामाला येते. म्हणजे स्त्री-पुरुषांतील फरक हा जास्तीत जास्त दोन अडीच टक्क्यांचा आहे.
 (२) आधी स्त्री का आधी पुरुष
 मनुष्यजातीत मुख्य काय तो पुरुष, स्त्री म्हणजे त्यापासून वेगळी तयार झालेली, प्रथम पुरुष जन्माला आला आणि मग स्त्री तयार झाली अशा समजुती अनेक धर्मांतील भाकडकथांनी सांगितल्या आहेत. मनुने ईलाला तयार केले किंवा पुरुषाच्या डाव्या बरगडीचे हाड घेऊन ईश्वराने स्त्री तयार केली अश्या अजागळ कथा परंपरेने सांगितल्या जातात. पण वस्तुतः स्त्री ही मूळ मनुष्य आहे. पुरुषत्व देणारे गुणसूत्र Y असल्याशिवाय मानवप्राणी बनू शकतो. परंतु X गुणसूत्राखेरीज मानवप्राणी असूच शकत नाही. गमतीची गोष्ट म्हणजे सर्वच प्राण्यांत असे असते असे नाही. उदाहरणार्थ, पक्ष्यांमध्ये याच्या उलट आहे. नरपक्षी हा एकाच पद्धतीच्या गुणसूत्रांच्या जोड्यांनी बनतो तर मादीमध्ये एका जोडीतील एक गुणसूत्र वेगळ्या पद्धतीचे असते.
 (३) संप्रेरके

 जन्मणारे मूल मुलगा का मुलगी हे गर्भधारणेच्या वेळीच निश्चित होत असले तरी गर्भावस्थेच्या पहिल्या सहा आठवड्यांत दोन्ही गर्भात काहीच फरक नसतो. त्यानंतर लिंगव्यवस्थेतील बदल हळूहळू होऊ लागतात. म्हणजे काय? मानवाच्या शरीरात काही संप्रेरक द्राव (हार्मोन्स) तयार होत असतात. त्यांचे दोन प्रकार असतात. एक पुंसंप्रेरके (मेल हार्मोन्स) आणि दुसरा स्त्रीसंप्रेरके (फीमेल हार्मोन्स) ही दोन्ही प्रकारची संप्रेरके स्त्री व पुरुष दोघांच्याही शरीरांत तयार होत असतात. फक्त पुरुषांच्या शरीरात तयार होणाऱ्या पुं-संप्रेरकांचे प्रमाण स्त्री-संप्रेरकांपेक्षा जास्त तर स्त्रीच्या शरीरात तयार होणाऱ्या स्त्री-संप्रेरकांचे प्रमाण पुं-संप्रेरकांपेक्षा जास्त इतकाच फरक. म्हणजे स्त्री आणि

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ४६