पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साली स्पष्टपणे सांगितली, "स्त्री आणि पुरुष... या उभयतांमध्ये जास्त श्रेष्ठ स्त्रीच आहे."
 श्रेष्ठतेचा वाद
 या प्रश्नावर खरीखुरी परिस्थिती काय आहे? स्त्री पुरुषापेक्षा निसर्गानेच कमी प्रतीची केली आहे असे गृहीत धरले तरीसुद्धा आज तिला मिळणारी वागणूक ही दुष्टपणाची ठरेल. दैवाने अपंग झालेल्यावर निदान करुणेने दया दाखविली जाते. स्त्री पुरुषाच्या तुलनेने कोणत्याही बाबतीत अपंग असेल तर तिच्याबद्दल विशेष सहानुभूतीने विचार करणे माणुसकीचे झाले असते.
 पण, वस्तुस्थिती याच्या नेमकी उलटीच आहे. ही वस्तुस्थिती स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. अगदी सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या किंवा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या स्त्रिया शेवटी "आपण बायामाणसं, आपण पुरुषांची बरोबरी कशी करणार?" असं सहजपणे बोलून जातात. लहानपणी आईच्या मांडीपासून 'मुलगी ही कमी आहे, मुलगा हा भारी आहे' हे इतक्या प्रकारांनी सुचविले, सांगितले, दाखविले आणि पढविले जाते की त्याबद्दल आता मुलांच्याही मनात शंका येत नाही आणि मुलींच्या तर नाहीच नाही. कधी चुकून एखादी मुलगी थोडे खोडकरपणे किंवा उद्दामपणे वागली तर तिला कायमची आठवण राहील अशी शिक्षा ताबडतोब दिली जाते. एखाद्या मुलाने मनाची जरा ऋजुता दाखविली तर त्याचीही लगेच "बायक्या" म्हणून हेटाळणी होते. यामुळे, हा धडा पक्का गिरविला गेला आहे की बायका म्हणजे पुरुषांपेक्षा कमीच.
 जीवशास्त्रीय संशोधन
 आजपर्यंतचे संशोधन या विषयावर काय सांगते ते पाहू.
 (१) लिंग निश्चितीचे जीवशास्त्रीय सूत्र :

 मुलगे आणि मुली दोन्ही एकाच आईबापांच्या पोटी जन्म घेतात. आईच्या शरीरातील गुणसूत्रां (क्रोमोझोम्स्) च्या २३ जोड्यांपैकी प्रत्येकी एक अशी २३ गुणसूत्रे आणि बापाच्या शरीरातील गुणसूत्रांच्या २३ जोड्यांपैकी प्रत्येकी एक अशी २३ गुणसूत्रे एकत्र येतात. ही दोन्ही मिळून मुलाच्या शरीरातील गुणसूत्राच्या २३ जोड्या तयार होतात. प्रत्येक गुणसूत्राचे काही विशेष काम आहे. काही डोळ्यांचा रंग ठरवितात तर काही केसांचा. माणसाच्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे रूप ही गुणसूत्रे ठरवितात. स्त्रियांच्या शरीरातील गुणसूत्रांच्या २३ जोड्यांपैकी प्रत्येक जोडीतील दोन्ही गुणसूत्रे एकाच प्रकारची असतात. पुरुषांच्या बाबतीतही फारसा फरक नाही. गुणसूत्रांच्या २३ जोड्यांपैकी २२

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ४५