पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/28

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 विशेष म्हणजे, 'स्वराज्याची तहान सुराज्याने भागणार नाही' या लोकमान्यांच्या घोषणेच्या विपरीतच काही घडले. राजकीय स्वातंत्र्य मिळाले, बाईचे स्वातंत्र्य कमी झाले. पण, अनेक तऱ्हांनी बाईचे जीवन सुकरही झाले.
 शेतकरी महिला आघाडीच्या शिबिरांत सगळ्या बायांनी सांगितले की, शिवणयंत्र आले आणि बाजारच्या गावी जाऊन शिंप्याला माप देण्याचे अवघडपण टळले; गावात दळणाची गिरणी आली आणि दररोज पहाटेची कमरमोड थांबली; डिझेल इंजिन आले, विजेची मोटार आली आणि पाण्याकरिता डोक्याखांद्यावर हंड्यांची उतरंड घेऊन चालणे संपले. माणसे अलीकडे कॉलरा, देवी, प्लेग यासारख्या साथींनी फारशी मरत नाहीत; अगदी विषमज्वर झाला तरी गोळ्या घेतल्या म्हणजे बरा होतो.
 शेतकरी महिला आघाडीच्या जवळजवळ निरक्षर स्त्रियांनी एक मोठा सिद्धांत मांडला. सर्वसाधारण लोकांच्या आयुष्यात सुधारणा होते ती तंत्रज्ञानाच्या प्रगतीने. हे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण करून झारीतील शुक्राचार्याचे काम सरकार आणि स्वयंसेवी संस्था करतात. प्रगती होते ती तंत्रज्ञानामुळे, अडथळे आणणारे शासन असूनही होते. कारण, 'सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार यही समस्या है.' एका तपानंतरसुद्धा पुन्हा एकदा, मुक्ताईने वडील भावाला बोध करावा तसे माझ्या बहिणी मला त्यांच्या जीवनाचे एक एक पदर उलगडून दाखवीत एक नवे दर्शन माझ्यासमोर ठेवीत होत्या.
 स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव
 या गोष्टीचा अनुभव पुन्हा एकदा गेल्या महिनाभरात आला. शेतकरी महिला आघाडीच्या स्त्रियांच्या 'अशिक्षित पटुत्वा'चा जो विलक्षण अनुभव मला आला त्याचा हा आढावा. शेतकरी महिला आघाडीने दारू दुकान बंदी, लक्ष्मीमुक्ती, सीताशेती, माजघरशेती असे अनेक - कार्यक्रम राबविले ते वेगळेच. स्त्रीजन्माला न जाता स्त्रीजीवनाचे सम्यक ज्ञान घडविणाऱ्या माझ्या मुक्ताईंच्या कौतुकाचा हा आलेख आहे.
 २००७ जवळ आले आहे. भारतीय स्वातंत्र्याची ६० वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव- हीरकमहोत्सव साजरा व्हायचा आहे. १९९७-९८ साली स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने देशातील परिस्थितीचा व्यापक आढावा शेतकरी संघटनेने घेतला, शेतकरी महिला आघाडीनेही घेतला. आता लगेच १० वर्षांतच पुन्हा काय आढावा घ्यायचा?

 शेतकरी संघटनेच्या दृष्टीने अलीकडच्या काही वर्षांत काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. २५ वर्षांपूर्वी देशातील गरिबीचा आणि गरिबांचा अभ्यास

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / २७