पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करणाऱ्या सर्व विद्वानांचे एकमत होते की, 'गरिबीचा संबंध शेतीशी आहे. शेतकरी गरीब आहे, कर्जबाजारी आहे ; शेतमजूर अर्धपोटी आहे.' त्या काळी गरिबी निर्मूलनाचे बहुतेक कार्यक्रम शेतीव्यवसायाला डोळ्यासमोर ठेवून आखले जात. त्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सरकारी तिजोरीतून सुटणारा बहुतेक पैसा, कै. राजीव गांधी यांच्या हिशोबाप्रमाणे रुपयातील ८५ पैसे, पुढारी आणि अधिकारी खाऊन जात आणि शेतकऱ्यांपर्यंत काहीच पोहोचत नसे ही गोष्ट वेगळी. पण, त्या काळी गरिबी व्यवसायातून निघते, तो काही कोण्या एका जातीचा किंवा धर्माचा प्रश्न नाही याबद्दल कोणाच्याही मनात शंका नव्हती.
 अलीकडे अलीकडे हे बदलले आहे. म्हणजे गरिबीच्या वाटपात काही बदल झाला असे नाही. पण, गरिबीचे राजकारण बदलले आहे. गठ्ठा मतांच्या राजकारणासाठी दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय यांच्यासाठी अधिकाधिक व्यापक आरक्षण देण्याचे राजकारण फळफळू लागले आहे. अल्पसंख्याकांच्या मतावर डोळा ठेवून त्यांच्यातील एका विशिष्ट समाजाचा अनुनय करणे म्हणजे मोठी राजकारणपटुता मानली जाऊ लागली आहे. केवळ २० वर्षांपूर्वी गरिबीची व्याख्या आर्थिक होती, जातीपातींवर आधारलेली नव्हती. आता ते सारे बदलले आहे.

 अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने (१९९८ ते २००४) हिंदुत्ववाद्यांना आटोक्यात ठेवून खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण पुढे रेटण्याचे काम केले. १९९१ साली त्या वेळचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी नेहरूप्रणीत समाजवादी समाजरचनेला पहिला टोला दिला आणि लायसेन्स्-परमिट-कोटा राज्य संपवायला सुरुवात केली. त्यांच्या आर्थिक सुधारांची मजल शहरी भागापुरतीच मर्यादित राहिली. उद्योगधंद्यांकरिता लागणारी लालफितीची व्यवस्था काहीशी ढिली झाली. पण, तेवढ्यानेसुद्धा हिंदुस्थानातील उद्योजक समाजात चेतना आली. विदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीवरील बंधने कमी झाल्यावर त्याचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या उद्योगधंद्यांची कार्यक्षमता वाढवायला सुरुवात केली; वाहतूक, संचार इत्यादी संरचनांचा विकास केला. भारतीयांच्या बहुराष्ट्रीय कंपन्या बनतील असे कधी वाटले नव्हते, ते प्रत्यक्षात घडून आले. माहितीतंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे नाव गाजू लागले. आर्थिक सुधारांचा प्रमुख नायक हा बुद्धिमंत, धाडशी आणि कल्पक आहे हे राष्ट्रीय लोकशाही सरकारच्या लक्षात आले होते. त्या आधारानेच त्या सरकारच्या शेवटच्या तिमाहीत त्यांनी विकासाची गती १० टक्क्यांच्या वर नेऊन दाखविली. परंतु विकासाच्या या प्रचंड हनुमानझेपेत

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / २८