पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रमाण व्यस्त असते किंवा दिशा वेगवेगळ्या असतात तेच महिला संघटनांचे पायाभूत विषय होत.
 एवढे ठरल्यानंतर शेतकरी महिला आघाडीने एक नवीन उपक्रम सुरू केला. जिल्ह्याजिल्ह्यात महिलांची शिबिरे घेण्यात आली. देशाचे स्वातंत्र्य नासले पण, स्त्रीच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांत काय घडले? स्त्रियांनी काय कमावले, काय गमावले? याचा वेगळा ताळेबंद मांडण्याचे ठरले. देशात इतरत्र कोठेही स्त्रियांच्या प्रगतीचा वेगळा आलेख मांडण्याचा विचारही कोणा मुखंडीच्या मनात आला नव्हता.
 शेतकरी महिला आघाडीची नेहमीची पद्धत - कोणत्याही स्त्रीप्रश्नावर भूमिका घ्यायची झाली म्हणजे कौल लावायचा तो शेतकरी बहिणींना. त्या विषयावर त्यांना काय वाटते ? त्यांचा प्रत्यक्ष अनुभव काय आहे? हे कळले म्हणजे सारा प्रश्नच स्वच्छ स्वच्छ समजू लागतो. या वेळी शिबिरांची आणि शिबिरार्थी महिलांची संख्या वाढली. १० ते १२ जिल्ह्यांत महिलांची शिबिरे भरली. स्वातंत्र्यानंतरच्या ५० वर्षांत ग्रामीण बायकांच्या आयुष्यात काही सुख डोकावले काय? त्या मानाने त्यांचे कष्ट, दु:ख, चिंता वाढल्या की कमी झाल्या? बहिणींसमोर प्रश्न ठेवले. १९८६ सालच्या पहिल्या शिबिरांच्या पहिल्या फेरीत आणि १९९८ सालच्या फेरीत मोठा फरक पडला होता. मध्यंतरीच्या काळात शेतकरी महिला आघाडीच्या बहिणींनी दारूची दुकाने कुलूप लावून बंद करण्याची किंवा प्रसंगी फोडण्याची मर्दुमकी गाजविली होती; लक्ष्मीमुक्तीच्या कार्यक्रमामुळे दोन लाखांच्या वर महिलांच्या नावे जमिनी झाल्या होत्या, बोलण्याचे अगदी मायक्रोफोनच्या समोर जाऊन बोलण्याचे त्यांना काही भय वाटेनासे झाले होते.
 स्वातंत्र्यानंतर काय झाले?

 पहिली गोष्ट - गावात दारू फार माजली. जागोजागी गुंडपुंडांचे अड्डे बसू लागले. बायकांना एकटीदुकटीने रस्त्याने जाणे दुरापास्त झाले. इंग्रजांच्या काळात हिम्मत करून पोलिसांकडे गेले तर संरक्षणाची खात्री वाटे; अलीकडे, गुंड आणि पोलिसांची हातमिळवणी झाली असे वाटते. गुंड पोलिसाच्या थाटात फिरतात आणि पोलिस गुंडांसारखे वागतात. बाईवर अत्याचार झाला तर गुपचूप बसणे श्रेयस्कर; पोलिसांकडे गेले तर आणखी काय धिंडवडे निघतील हे सांगता येत नाही. थोडक्यात, स्वातंत्र्य आले आणि सुरक्षाव्यवस्था ढासळली. बाईला पूर्वीच्या काळी असलेले 'असूर्यम् पश्या'पण अधिक श्रेयस्कर वाटू लागले. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण, बाईचे स्वातंत्र्य कमी झाले.

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / २६