पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्नाला हात घातला आणि दोन वर्षांत साडेसहाशे गावांनी 'लक्ष्मीमुक्ती' साजरी केली, दोन लाखांवर स्त्रियांच्या नावे त्यांच्या घरधन्यांनी जमिनी लिहून दिल्या. हे असले काही जगावेगळे कर्तृत्व शेतकरी महिला आघाडीच दाखवू शकते.
 या ताकदीमागे विचारांचे सामर्थ्य असणार हे उघडच आहे. पण, अनेक वेळा विचारांचे सामर्थ्य नसतानाही संघटनेच्या आधाराने सामर्थ्य तयार होते.
 जातिवाद आणि धर्मवाद यांच्या घोषणांनी समाजात विद्वेषाचा विखार पसरविणाऱ्या संघटनांनाही जनमताचा उदंड पाठिंबा मिळतो हे आपण प्रत्यक्ष पाहतो आहोत. गर्दी काय, तमाशालाही जमते आणि कोणा शास्त्री, बाबा महाराज यांच्या प्रवचनांनाही. आज या क्षणी कोणी सामर्थ्यवान दिसतो म्हणजे त्याची बाजू खरी, त्याचा विचारही योग्य अशी मांडणी फक्त पुरूष करतात. कंसाचे भले साम्राज्य होते म्हणजे काही कंसप्रवृत्तीचे समर्थन होत नाही. रावणाचे तर वैभव काय विचारावे? आजही अनेक रावण आपल्या सामर्थ्याचा डांगोरा पिटीत दिमाखाने फिरत आहेत.
 .... आणि विचारांचे
 शेतकरी महिला आघाडीकडे सामर्थ्य आहे ते कोणत्याही साधनसंपत्तीतून आलेले नाही. साधनांची, पैशांची, वाहनांची सारी रडारडच आहे. गावगन्ना महाराजांच्या प्रवचनांना जसे शानदार मांडव बांधले जातात, कमानी उभारल्या जातात तसा राजेशाही थाट शेतकरी महिला आघाडीच्या राज्यभरच्या अधिवेशनाच्या वेळीही असत नाही. माणसे गोळा करायला कोठे ट्रक फिरत नाही. एवढ्या मोठ्या संख्येने कडेवर पोरे घेऊन बाया येतात, त्यांच्यासाठी कोणतीच सोय नसते - ना राहण्याची, ना खाण्याची. सभेच्या वेळीदेखील पाणी नाही, सावली नाही अशा परिस्थितीत घरून बांधून आणलेल्या शिदोरीवर निर्वाह करीत बाया तेथे राहतात. शेतकरी महिला आघाडीच्या ताकदीमागे विचारांचे सामर्थ्य असल्याचा हा पुरावा आहे की, विचाराखेरीज दुसऱ्या कोणत्याही साधनसंपत्तीचा आधार या आघाडीस नाही.
 शेतकरी महिला आघाडीचा विचार म्हणजे थोडक्यात काय आहे?
 समाजात स्त्रीला दुय्यम स्थान आहे; 'अस्तुरी जल्मा नको घालू श्रीहरि' अशी स्थिती आहे.

 निसर्गतः, शारीरिकदृष्ट्या स्त्री पुरुषापेक्षा सामर्थ्याने, बुद्धीने कमी नाही; डावे उजवे करायचे झाले तर प्रतिभा आणि बाळाला जन्म देणे व संगोपन यांसाठी आवश्यक प्रेरणांत सरसच आहे. पुरुषांच्या तुलनेने

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १४८