पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चिंता तिला करावी लागते. देशाच्या साऱ्या परिस्थितीची तपासणी करताना स्त्रियांचा हा दृष्टिकोन प्रकट होणे महत्त्वाचे आहे.
 दुसऱ्यांदा तशीच चूक नको
 "एकमय लोक' या अर्थाने राष्ट्र झाले नाही, जातिभेद कायम राहिला आणि स्वातंत्र्य आले तर त्यामुळे पेशवाई नव्याने तयार होईल' ही भीती जोतिबांनी व्यक्त केली होती आणि ती खरी ठरली. पुरुष आणि स्त्रिया यांचे मिळून 'एकमय लोक' या अर्थाने राष्ट्र तयार झाले नाही तर पुढच्या पन्नास वर्षांतही नवी पुरुषशाही तयार होण्याचा धोका राहील. इंडिया-भारत संघर्ष टाळल्याखेरीज देश तरत नाही हे पन्नास वर्षांचा स्वातंत्र्याचा कालखंड वाया घालविल्यानंतर मान्य झाले; पण त्याबरोबर, स्त्रिया आणि पुरुष यांच्या विकासातील विषमता लक्षात न घेता पुढील कार्यक्रमांची आखणी केली गेली तर पन्नास वर्षांनी पुन्हा एकदा असेच रडगाणे गाण्याचा कार्यक्रम ठेवावा लागेल.
 याच विषयावरचे चिंतन, मांडणी आणि आंदोलन करण्याची प्रकृती आणि सामर्थ्य साऱ्या देशभरच्या महिला चळवळीत एकट्या शेतकरी महिला आघाडीकडेच आहे असे मला वाटते. शेतकरी महिला आघाडीने हे काम केले नाही तर ताळेबंद अपुरा राहील, देशाच्या विकासकार्यक्रमाला पुन्हा एकदा चुकीची दिशा लागेल आणि कोणी बाई बोललीच नाही म्हणून तिच्या डोळ्यांतील आसवे पुन्हा मूकच राहून जातील. अशी ही एक ऐतिहासिक जबाबदारी आणि कामगिरी शेतकरी महिला आघाडीवर काळाने सोपविली आहे.
 सामर्थ्य चळवळीचे

 शेतकरी महिला आघाडी प्रकृतीने आणि सामर्थ्याने ही जबाबदारी पेलू शकते, सामर्थ्यांचा मुद्दा स्पष्ट आहे. ग्रामीण भागातील महिलांना शेतकरी महिला आघाडीने जेवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आणले त्याला काही तुलनाच नाही. 'दारूदुकानबंदी'सारख्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजारो स्त्रिया तुरुंगवासाची तयारी ठेवून दारूदुकानांना कुलुपे लावण्यास आणि ती दुकाने उद्ध्वस्त करण्यासही तयार झाल्या. शेतकरी संघटनेच्या आरंभीच्या काळात, 'सूर्य ज्यांना पाहात नाही आणि ज्या सूर्याला पाहात नाहीत' अशी परंपरा होती त्या स्त्रियासुद्धा गावोगाव, दुसऱ्या जिल्ह्यांत एवढेच नव्हे तर, दूरवरच्या राज्यांतही शेतकरी महिला आघाडीच्या कार्यक्रमासाठी जाऊ लागल्या. स्त्रियांच्या प्रश्नातील सर्वांत जटिल प्रश्न म्हणजे स्त्रियांच्या मालमत्तेसंबंधी हक्काचा प्रश्न; निदान सीतेच्या वनवासाइतका हा जुना आजार आहे. शेतकरी महिला आघाडीने या

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १४७