पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 लहान असलेले आकारमान कोणत्याही प्रकारे दुय्यमत्व लादत नाही.

  • स्त्रीचे दुय्यमत्व सदासर्वकाळ साऱ्या कालखंडात राहिले आहे असे नाही. तिचे समाजातील स्थान तत्कालीन आर्थिक-सामाजिक परिस्थितीनुरूप ठरते.
  • वेगवेगळ्या देशांत, वेगवेगळ्या काळांत स्त्रियांनी सत्ता, तलवार सामर्थ्याने वागविल्या आहेत.
  • स्त्रियांच्या आजच्या दुय्यम अवस्थेचे मूळ शेतीमालाच्या वरकड उत्पादनाच्या संपादनासाठी सुरू झालेल्या आणि चाललेल्या क्रूर लुटीच्या व्यवस्थेत आहे. लुटालुटीच्या काळात पुरुषांनी स्वसंरक्षणासाठी हाती तलवार घेतली आणि स्त्रियांकडे 'चूलमूल' कामे आली.
  • लिंगभेदावर आधारलेल्या या श्रमविभागणीमुळे स्त्रियांवर अन्याय झाला, तसाच पुरुषांवरही.
  • ही श्रमविभागणी बदलायची म्हणजे पुरुषांनी काही चूलमूल कामे स्वीकारायची आणि स्त्रियांनी पारंपरिक पुरुषक्षेत्रातील कामे घ्यायची असा नाही.
  • पुरुषांना काय किंवा स्त्रियांना काय, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती अनन्यसाधारण असते; त्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे ज्याला त्याला आयुष्याची दिशा ठरविता आली पाहिजे.
  • हे बदल सामाजिक सुधारणांचे तकलुपी कायदे करून होणार नाहीत. लुटीची व्यवस्था संपविणे ही स्त्रियांच्या आणि पुरुषांच्याही मुक्तीची पूर्वअट आहे.
  • शोषणव्यवस्था न संपविता काही क्षेत्रांत काही काळ विकास होतोसा वाटले तरी असल्या विकासाचा स्त्रियांना काहीही फायदा होत नाही; उलट, तोटाच होतो.
  • शासनाचा मूळ उगम लुटालुटीत असल्यामुळे शासन आणि नोकरशाही यांची खच्ची करणे हा स्त्री-पुरुषमुक्तीचा प्राथमिक कार्यक्रम आहे.
  • स्त्रीसंघटनांनी आपली सारी ताकद लुटीची व्यवस्था संपविणे आणि त्याबरोबर, स्त्रीला माणूस म्हणून उभे राहण्याचा आत्मविश्वास तयार होईल अशा कामांसाठी लावावी.
  • शोषणाची व्यवस्था संपत आहे. शारीरिक ताकदीचे महत्त्व संपविणारे तंत्रज्ञान पुढे येत आहे. स्वतंत्रतेच्या नव्या युगात स्त्री-पुरुषमुक्तीचा झेंडा लावण्यासाठी आजचा मुहूर्त चांगला आहे.
    चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १४९